Konkan coastal development pudhari photo
रायगड

Konkan coastal development : जेटी आणि पोचरस्त्यांसाठी १७० कोटींचा निधी

कोकणातील विविध १०४ कामांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : कोकण किनारपट्टीच्या विकासाला चालना देण्यासाठी, जेटी उभारणी आणि जेटीपर्यंत जोडणाऱ्या पोचरस्त्यांच्या कामांना गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांमधील १०४ विविध कामांना यामुळे मोठा वेग मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत जेटी उभारणी, पोचरस्ते, संरक्षक भिंती, धूपप्रतिबंधक बंधारे, गाळ काढणे आणि प्रवासी सुविधांची कामे केली जाणार आहेत. यातील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डास सहाय्यक अनुदान, तरंगती जेटी व प्रवासी सुविधांच्या ७५ कामांसाठी १२६ कोटी रुपये, तर बंदरांपर्यंत रस्ते, रेल्वेमार्ग आणि बॅकवॉटर विकासाच्या २९ कामांसाठी ४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. यात वरसोली येथील रो-रो जेटी, पोचरस्ता, गाळ काढणे आणि दगडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच आक्षीसागर येथील जेटी, पोचरस्ता आणि गाळ काढण्याच्या कामांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून तेथे सध्या २० टक्के काम पूर्ण झाले आहे.

याशिवाय रेवस जेटी परिसरातील वाहनतळ व स्वच्छतागृहांचे काम, तसेच रेवदंडा रो-रो जेटी, अलिबाग, धरमतर, महाड, मुरुड, नागाव आणि करंजा परिसरातील पोचरस्त्यांचा समावेश आहे.इतर जिल्ह्यांचा विचार करता, पालघरमध्ये शंकर मंदिर-दांडा, पांजू, चिंचणी, सतपती, वडराई, खारेकुरण, वडिव, राजोडी, कळंब आणि नारंगी रो-रो जेटीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे.

  • रत्नागिरीतील बंदरांतर्गत रस्ते आणि राजीवाडा येथील १४३ कोटी ९७ लाख रुपयांच्या बंधाऱ्याचे कामही या योजनेतून होत असून ते सध्या २५ टक्क्यांवर पोहोचले आहे.एकूण ५७७ कोटी ५३ लाख रुपयांच्या मंजूर कामांपैकी मार्च २०२६ अखेर १३३ कोटी ९२ लाख रुपये वितरित झाले असून, २०२६-२७ या आर्थिक वर्षात आणखी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कोकणातील सागरी वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक मासेमारी व्यवसायाला मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT