Sports Bike Accident pudhari photo
रायगड

Raigad Road Accident : बोरघाटात भरधाव स्पोर्ट्स बाईकची कारला धडक

रायडर गंभीर जखमी; शिंग्रोबा मंदिराखालील वळणावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाट परिसरात भरधाव स्पोर्ट्स बाईकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. शनिवारी दुपारच्या सुमारास शिंग्रोबा मंदिराच्या खालील वळणावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील रायडर आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून खंडाळा येथून खोपोलीच्या दिशेने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करत होता. यावेळी शिंग्रोबा मंदिराच्या खाली असलेल्या वळणावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली फॉन्स कार त्याच्या नजरेस न आल्याने दुचाकीने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता एवढी होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला आणि दुचाकी त्याच्या पायावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. तर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी रायडरला तत्काळ मदतकार्य करत रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी वाशी येथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक स्पोर्ट्स बाईक रायडर्स जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून बोरघाट मार्गे भरधाव वेगाने प्रवास करताना दिसतात. घाटातील तीव्र वळणे, अरुंद रस्ते आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता अशा सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकींमुळे इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भरधाव वाहनचालकांवर कडक कारवाई व्हावी

बोरघाटातील धोकादायक वळणे आणि वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी शनिवार - रविवारच्या दिवशी विशेष गस्त वाढवून भरधाव वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. वेगापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची, हे प्रत्येक रायडरने लक्षात ठेवणे आता काळाची गरज बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT