खोपोली : दिवाळीच्या सणाचा आनंदोत्सव सुरू असतानाच खोपोली शहरात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येथील कारमेल स्कूलजवळील इंद्रप्रस्थ इमारतीत एकट्या राहणाऱ्या महेश्वरी रामचंद्रन (वय ७०, मूळ रा. केरळ) या वृद्ध महिलेचा अज्ञात आरोपींनी हातपाय बांधून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावून ते फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील स्वामी विवेकानंद मार्गावरील भानवज परिसरात असलेल्या कारमेल स्कूलजवळील इंद्रप्रस्थ इमारतीत ७० वर्षीय महेश्वरी रामचंद्रन या एकट्याच राहत होत्या. बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.
आरोपींनी रामचंद्रन यांचे हातपाय बांधून त्यांची निर्घृण हत्या केली आणि अंगावरील मौल्यवान दागिने लुटले. चोरीच्या उद्देशाने घरातील वस्तूही अस्ताव्यस्त करण्यात आल्या होत्या. हत्या केल्यानंतर महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह घरातच ठेवून, ती घरात नसल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले आणि पसार झाले.
घराबाहेर कुलूप पाहून महेश्वरी रामचंद्रन कुठेतरी बाहेर गेल्या असाव्यात, असे सुरुवातीला वाटले. मात्र, त्यांचा संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता, मोबाईल घरामध्येच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, महेश्वरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता श्वान पथक (डॉग स्कॉड), फॉरेन्सिक पथक आणि जिल्हा प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला होता. गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ऐन सणासुदीच्या काळात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कुलूप लावून पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान खोपोली पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान एकट्या राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.