रोहा तालुक्यात खरीप भातशेती क्षेत्र घटतेय pudhari photo
रायगड

Roha paddy cultivation: रोहा तालुक्यात खरीप भातशेती क्षेत्र घटतेय

दहा वर्षात अडीच हजार हे. क्षेत्रात घट; वाढते शहरीकरण; तरुणांची उदासीनता भातशेतीला ठरतेय मारक

पुढारी वृत्तसेवा

रोहा : महादेव सरसंबे

‌‘जिल्ह्यात भात शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यात शेती ओसाड पडत असून तालुक्यातील भात शेती क्षेत्र घटत असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. जिल्ह्यातील भातशेतीसाठी रोहा तालुका हा प्रसिद्ध होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोहा तालुक्यात भातावर आधारित पोह्याचे कारखाने होते.

रोहाचे पोहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. आज हे कारखाने नाजूक स्थितीत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रोहा तालुक्यातील भात शेती घटत असल्याचे चित्र दिसत आहेत. या पोहा कारखानांना आता भात बाहेरून आणला जातो.

रोहा तालुक्यात पावसाळी व उन्हाळी भात शेती लावली जात असत. पारंपारिक सोना, जया, रत्ना यासह अन्य जातीचे बियाणे लावली जात असत. पावसावर अवलंबून असलेली पावसाळी भात शेतीचे पूर्वी 2017 च्या आधी क्षेत्र 9800 हेक्टर होते ते हळूहळू कमी होत आज 7100 हेक्टर एवढे झाले आहे. तर उन्हाळी म्हणजे कालव्याच्या व कुंडलिका नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेले भात शेतीचे क्षेत्र 2000 हेक्टर पेक्षा जास्त होते.

आता 200 ते 300 हेक्टर वर भात शेती लावली जाते. पूर्वी भातशेतीची उत्पादन क्षमता हेक्टरी कमी असले तरी लागवडीचे क्षेत्र मात्र जास्त होते आता लागवडीचे क्षेत्र कमी असले तरी उत्पादन हेक्टरी वाढले आहे. पूर्वी हेक्टरी हेक्टरी भाताचे 26 ते 27 टन उत्पादन काढले जात होते आता तेच हेक्टरी भाताचे 32 टन उत्पादन काढले जाते. परंतु आता भात लागवडीचे क्षेत्र घटले आहे.

भात शेती लागवडीचे क्षेत्रघटनाच्या अनेक कारणे पुढे येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतीकडे तरुणांची उदासीनता दिसून येते. औद्योगिक क्षेत्रात नोकरी करणे शेतीपेक्षा तरुणांना योग्य वाटत आहे. शेतात राबण्याची मेहनत कमी होत आहे. वाढते शहरीकरण ही भात लागवड क्षेत्र कमी होण्याचे कारण ओळखले जाते.

मजुराची टंचाई भासत असल्याने अनेकांनी भातशेती करणे सोडले आहे. काही प्रयोग शेतकऱ्यांनी मात्र यांत्रिकीकरणाचा वापर करत आज भात शेती करताना दिसत आहेत. उत्पादनासाठी लागणारा खर्च जास्त असून उत्पादनातुन उत्पन्न कमी येत असल्याने भात शेती करणे खर्चिक असल्याने भातशेतीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

उन्हाळी भात शेती घटण्याचे प्रमुख कारणांमध्ये प्रामुख्याने बंद झालेले कालव्याचे पाणी हे आहे. कालव्याचे पाणी येत नसल्यामुळे भात शेती आता होत नाही. काहीही पर्यायी कुंडलीका नदीच्या तीरावर भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली आहे. ही पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी आता स्वीकारलेली आहे.

कालव्याचे पाणी सोडल्यास भात शेतीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.दुसरीकडे धाटाव औद्योगिक क्षेत्रामध्ये तरुण नोकरी करत असल्याने त्यांचं भात शेतीकडे कमी उत्पन्न मिळत असल्याने दुर्लक्ष झाले आहे. तर काही तरुण अथवा नागरिक रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाणे शहराकडे वळले आहेत. त्यामुळे भात शेती ही केली जात नाही.

घरी असलेले वडीलधारी माणसं भात शेती करतात. परंतु काहीच ठिकाणी भात शेती ही ओसाड पडली आहे. रोहा तालुक्यात पूर्वी 1800 ते 2000 हेक्टर च्या आसपास उन्हाळी भात शेती केली जात असत. आता हे क्षेत्र घटून 200 आसपास आले आहे.

वाढत्या शहरीकरण यामुळे रोहा तालुक्यातील भात शेतीचे प्रमाण घटत चालले आहे. यापूर्वी 2017-2018 मध्ये भात शेती ही 9850 हेक्टर क्षेत्रावरती होती ती आता 7100 हेक्टर पेक्षाही कमी क्षेत्रावर ती आल्याचे दिसून येत आहे.
महादेव करे, कृषी अधिकारी, रोहा तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT