पनवेल : खारघर टोल नाक्याजवळ सायन–पनवेल महामार्गावर शुक्रवारी (दि.१४) उशिरा रात्री झालेल्या एका भीषण अपघातात स्विफ्ट कार थेट ३० फूट खोल नदीत कोसळून कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. मागून आलेल्या क्रेटा कारने जोरात दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार खारघर टोल नाक्याजवळील पुलावरून जात होती. याचवेळी मागून वेगात आलेल्या क्रेटा कारने स्विफ्टला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की स्विफ्ट कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट पुलावरच्या पत्र्याच्या रेलिंगला तोडून खाली कासाडी नदीत कोसळली. अंदाजे ३० फूट खाली पडलेल्या कारचा चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. पाण्यात कोसळलेली कार मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आली. मात्र तोपर्यंत कारचालकाचा मृत्यू झालेला होता. मृतदेहाला पुढील तपासासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या परिसरात पुलावरील वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महामार्गावरील वेग नियंत्रित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती पावले उचलण्याची मागणी सुरू झाली आहे.