खोपोली : प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यातील सर्वच ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणात भात पिकाची लावणी केली होती. कापणीच्या शेवटच्या टप्प्यात निसर्गाची अवकृपा झाली असल्याने चिंतेचे ढग दाटले आहे. शेतात डोलणाऱ्या पिकांवर अवकाळी बरसत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गेल्या आठ नऊ दिवसांपासून खालापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापणीसाठी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आश्रू अनावर होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला सापडल्याने ओला दुष्काळ जाहीर करीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणासह सुरू असलेल्या पावसामुळे कापणी रखडली आहे. आधीच कापलेले भाताचे पीक ओलसर राहून खराब होत आहे. सततच्या आर्द्रतेमुळे भाताची गुणवत्ता घटू लागली असून या पावसाचा फटका तालुक्यातील सर्वच भागांतील शेतकऱ्यांना बसत आहे. खालापूर तालुक्यात भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. प्रत्येक वर्षी या भागात जून महिन्यात भात लागवडीला सुरुवात होते आणि ऑक्टोबरच्या उत्तरायांत कापणी सुरू होते. मात्र यावर्षी हवामानातील अनिश्विततेमुळे लागवड उशिरा झाली होती. आता कापणी सुरू होताच पुन्हा पावसाचा अडथळा उभा राहिल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून खालापूर तालुक्यातील वातावरण ढगाळ असून दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे भाताच्या झुडपांना अतिरिक्त ओलावा मिळत असल्याने उत्पादनात घट असून कापणीस योग्य असलेल्या भाताच्या पीकाला सूर्यप्रकाश न मिळाल्याने दाण्यांची चमक आणि दर्जा कमी होत आहे. त्यामुळे बाजारात दरही कमी मिळण्याची शक्यता आहे. तर जे पीक कापणीस आले आहे, ते सातत्याने पाऊस सुरू असल्याने कापता येत नाही. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पीक शेतातच आडवे पडले आहे. ते चिखलात पडल्याने धान्य खराब झाले आहे. परिणामी यंदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याची चिन्हे आहेत.
शेतीचे मोठे नुकसान...
मुसळधार पावसामुळे खालापूर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भातकापणीच्या हंगामात झालेल्या जोरदार पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, शेतकरी आपल्या घामातून भात पिकवतो, मात्र अवकाळी पावसामुळे त्याच्या स्वप्नांवर वारंवार पाणी फेरले जात आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा प्रकारच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत असून या संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाकडून तत्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीक हाता-तोंडाशी आले असताना अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस गेल्या आठ नऊ दिवसांपासून सुरू राहिल्याने मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने पूर्ण मेहनतीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करीत नुकसान भरपाई द्यावी.पावसामुळे भात खाली पडून नुकसान होण्याची शक्यता आहे.दत्तात्रेय पांडुरंग दिसले, शेतकरी, केळवली