महाड ः श्रीकृष्ण बाळ
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग महाड अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून चालविण्यात येणार्या खैरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या 2022 पासून मार्च 24 अखेर सार्वजनिक पाणीपुरवठा व वैयक्तिक पाणीपुरवठा मिळून सुमारे तीन कोटी 62 लाख 10 हजार 674 रुपयांची थकबाकी असल्याची माहिती या विभागाकडून प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुमारे दोन दशकांपेक्षा आधी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती खाडीपत्त्यामधील ग्रामस्थांच्या असलेल्या पिण्याच्या पाणीटंचाई बाबत सर्वांकस विचार करून शासनाने या योजनेला मंजुरी दिली होती.
रायगड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत या योजनेची कार्यपूर्ती गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. या संदर्भात सन 2022 पासून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण मागणी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी दोन कोटी 89 लाख 73 हजार 454 असून यापैकी मार्च 24 अखेर आठ लाख 52 हजार 747 रुपयांचीच वसुली झाली असून वैयक्तिक नळ पाणीपुरवठा साठी एकूण असणार्या 89 लाख 47 हजार 389 रुपयांपैकी आठ लाख 57,422 रुपयाची वसुली करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
रा. जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत महत्त्वपूर्ण योजना म्हणून या प्रादेशिक योजनेकडे पाहिले जाते मात्र मागील काही वर्षातील या भागातील प्राप्त होणार्या वसुलींची आकडेवारी पाहता या विभागाकडून आवश्यक त्या पद्धतीने वसुली करण्याचे विशेष प्रयत्न केले जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व ग्रा.पं.मध्ये पाणीपुरवठाची वीज बिले थकीत राहिल्याचे वृत्त एकीकडे दैनिक पुढारीने प्रकाशित केले असतानाच याच विषयासंदर्भात या तालुक्यातील महत्त्वपूर्ण पाणी योजनेबाबत प्राप्त झालेल्या माहितीने शासनाला महाड तालुक्यातूनच महसुली उत्पन्न प्राप्त होणार्या योजनांमधून कोट्यावधी रुपयांच्या थकीत रकमा कशा वसूल करावयाच्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेने हर घर जल ही योजना आता जवळपास देशाच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोचली आहे मात्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांच्या योजनांची पूर्तता केली जात असतानाच नागरिकांकडून मात्र त्या संदर्भात आवश्यक असलेली सहकार्याची भावना व संबंधित योजनेतील होणार्या खर्चाची जबाबदारी उचलण्यात येत नसल्याने शासनावर हा अतिरिक्त भार पडत असल्याचे या क्षेत्रातील मान्यवरांनी निदर्शनास आणले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या विविध समस्यांना राजकीय पक्षांकडून मांडला जाण्याची शक्यता असून यामुळे ग्रामीण भागातील विकासात्मक कामांबरोबरच ग्रामस्थांवर आलेल्या या अर्थरूपी बोजाबाबत हे संबंधित राजकीय पक्ष कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या योजनांची पूर्तता कोट्यावधी रुपये खर्चून शासनाकडून केली जात असतानाच किमान अपेक्षित असलेली या योजनेतील सहभागाची ग्रामस्थांची भूमिका त्यांनी योग्य पद्धतीने योग्य वेळेत पार पाडावी अशी अपेक्षा या विभागातील मान्यवर अधिकार्यांकडून व्यक्त होत आहे.
नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत खाडीपट्ट्यातील खैरे तर्फे तुडील, आदिश्ते, वलंग, रोहन, ओवळे, तेलंगे मोहल्ला, तेलंगे, चिंबावे मोहल्ला, चिंबावे सुतार कोंड, वराठी, गोमेंडी, ताडवाडी, जुई बुद्रुक, कोसबी, रावढळ, सोनघर, वामने, सापेतर्फे तुढील, लोअर तुडील, बेबल घर या गावांसह परिसरातील 29 वाड्यांना या योजनेअंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक रित्या पाणीपुरवठा केला जात आहे.