रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: खाडीपट्टयातील ग्रामीण भागात सद्या उन्हाचा पारा वाढला असला, तरी पावसाळा जवळ येत असल्याने शेतीमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. शेतकरी भर उन्हातही काळ्या आईची सेवा करीत असल्याचे चित्र सद्या खाडीपट्टयाच्या शिवारात फेरफटका मारला असता पहायला मिळाले. तरशेतीचे बांधबंदीस्त करण्याबरोबरच तरवे लावून मशागतीच्या कामात सद्या शेतकरी राजा रममाण झाला आहे.
तालुक्यासह खाडीपट्टा भागामध्ये यंदा एप्रिल पासूनच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोचला असून उन्हाच्या असह्य झळामुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू होत आहे. शेतकऱ्यांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.
शिमगोत्सव संपल्यानंतर एप्रिलसह मे महिन्यात लग्नाचा धुमधडाका अजून संपलेला नाही, आता मात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत लग्नसराई सुरु राहिल. मात्र यातूनही शेतकऱ्यांनी शेतीकडे आपला कल वळविला आहे.
कृषी तज्ञांकडून खाडीपट्टयामध्ये शिवारात बसून वेळोवेळी चांगल्याप्रकारे शेतीसंदर्भात मार्गदर्शन मिळत असल्याने यावर्षी अधिक जोमानेशेतीफुलवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरणामध्ये वाढलेला प्रचंड उष्मा, रखरखत्या उन्हामुळे जीवाची काहीली होताना पाहायला मिळत असून मात्र यातूनही शेतकरी राजा थांबलेला नाही.
सकाळी पहाटे उठून शेतामध्ये जाऊन पुन्हा सायंकाळी शेतीच्या बांधाची वाट पकडत आहे. वातावरणामध्ये मध्येच थोडेसे ढगाळ वातावरण येत असून तर गेली दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची प्रेधा तेरपेठ उडवली आहे.
अवकाळी पावसामुळे चार महिन्यासाठी जमा करून ठेवलेले लाकूडफाटा काही प्रमाणात भिजल्याने नुकसान झाले आहे. तर दुबार शेतीसह आंबा बागायतदारांना वातावरणाच्या बदलामुळे भरमसाठ नुकसान सोसावे लागले आहे. यावर्षी अंबा बागायतदार पूर्णपणे नुकसानीच्या खाईमध्ये लोटले आहेत.
दरम्यान, येथील शेतकरी काळ्या धरती आईच्या मशागतीत मग्न झालेला आहे. बैलजोडीच्या मदतीने मशागतीचे कामे दुर्मिळ होत चालली असली, तरी काही ठिकाणी बैलजोडीने तर काही ठिकाणी ट्रक्टरचा वापर वाढला आहे.