कर्जत : कशेळे गावातून जाणाऱ्या कशेळेमुरबाड, कशेळेकर्जत, कशेळेनेरळ, कशेळेकोठीबे आणि कशेळेखांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनाने दखल घेत कारवाई सुरू केली आहे. विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
बुधवारी पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, कशेळे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त पाहणीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या भागांना रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले असून संबंधित विक्रेते व दुकानदारांना दोन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
यावेळी ग्रामस्थ व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिक्रमण हटविणे ही काळाची गरज असून रस्ते व सार्वजनिक सुविधा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जुना एसटी बस थांबा तातडीने अतिक्रमणमुक्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित थांबा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती तसेच बस थांब्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. पोलीस प्रशासनाने कारवाईदरम्यान शांतता राखण्यात येईल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल, असे स्पष्ट केले. कशेळेतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, दिलेल्या मुदतीनंतर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
एसटी थांब्यावरील सुरक्षा धोक्याची
कशेळे नाक्यावरील जुना एसटी बस थांबा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. बस थांब्याची जागा व्यापली गेल्यामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची तीव्र चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कोठीबे मार्गावरील एसटी बसला वारंवार मागेपुढे करावे लागत असल्याचे चित्र होते, तर नेरळकडे जाणाऱ्या कंटेनर व जड वाहनांना वळण घेताना अडथळे येत होते. खांडसकडील वळणावरही अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढला होता. या सर्व बाबी प्रशासनाच्या पाहणीत स्पष्ट झाल्या.