नेरळ ः कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 अ वरील कशेळे भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कशेळे बाजारपेठ परिसरात या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट दिसून येत आहेत. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यांची कामे अपूर्ण ठेवण्यात आल्याने कशेळे बाजारपेठ येथील व्यापारी धुळीमुळे त्रस्त झाले आहेत.
समृद्धी महामार्गपासून शहापूर येथे तयार झालेला बायपास येथून शहापूर-मुरबाड-कर्जत खोपोली-वाकणं असा राष्ट्रीय महामार्ग 548 अ बनविण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण 100 टक्के पूर्ण झालेले नाही आणि त्यामुळे या रस्त्यावर आजही अनेक ठिकाणी डांबरीकरण असलेले भाग आहेत.
कशेळे गावात या राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हा रस्ता बनविणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कशेळे गावातील रस्ता आजही डांबरी ठेवला आहे. त्यामुळे हा रस्ता सतत खड्डेमय आणि नादुरुस्त असतो. मात्र, या रस्त्याने वाहतूक करणारी अवजड वाहने यांच्यासाठी लहान-मोठे खड्डे हे जाणवत नसल्याने दुपारच्या वेळी अवजड वाहने वेगाने जा-ये करतात. त्याचा परिणाम या रस्त्याच्या आजुबाजूला असलेले दुकानदारांच्या दुकानात धुळीचे लोट जाऊन पडत असतात.
स्थानिकांकडून आंदोलन
कशेळे ग्रामस्थांनी या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे श्रमदान करून भरले. मात्र तरी देखील राज्य रस्ते विकास महामंडळ कशेळे गावात येऊन तेथील रस्त्यावर नवीन डांबर टाकण्याचे काम करीत नाहीत. रस्त्यावरील धूळ सर्वांना त्रासदायक ठरत असल्याने स्थानिक आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या आंदोलनात स्थानिक उत्स्फूर्तपणे रस्ता रोको करू शकतात आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी कर्जत-मुरबाड रस्त्यावर होऊ शकते.