पनवेल : कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे अडकलेले पैसे तातडीने परत मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कळंबोली सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदारांनी सहभाग घेत सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी झालेल्या सभेत आंदोलनकर्त्यांनी कर्नाळा बँक घोटाळ्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची, जप्त मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याची तसेच घोटाळ्याच्या तपासाला गती देण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून ठेवी अडकून पडल्यामुळे हजारो ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
संघर्ष समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ठेवीदारांच्या प्रश्नाकडे सरकार आणि तपास यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, पोलिसांनी योग्य नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत शांततेत आंदोलन पार पाडले.
साडेपाचशे कोटी रुपयांचा घोटाळा
आजपर्यंत पाच लाख रुपयांवरील सुमारे अडीच हजार ठेवीदारांच्या ठेवी कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, काही गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश असून त्यांची एकूण रक्कम तब्बल २७२ कोटी रुपये आहे. साडेपाचशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात गेल्या पाच वर्षांत न्याय प्रशासनाला केवळ १० कोटी रुपये वसूल करता आले असून, पोसरी येथील जमिनीतून आणखी ३८ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे जप्त मालमत्तांचा लिलाव होत नसल्याने त्याचा फटका ठेवीदारांनाच बसत असल्याचे कांतीलाल कडू यांनी सांगितले.