मृत अवस्थेत आढळेली रानमांजर pudhari photo
रायगड

Karjat Tree Cutting : टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीमुळे साईडोंगरचे जंगल धोक्यात

वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त; संपूर्ण परिसंस्थेवर आघात; घरटी हरवलेले पक्षी आकाशात घिरट्या घालताहेत

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट वीज प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याने परिसरातील निसर्गसंपदा आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाली येथील साईडोंगर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने अनेक वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जंगलात विविध प्रकारचे जंगली प्राणी, पक्षी आणि अन्य वन्यजीवांचा वावर असून, वृक्षतोडीमुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

या वृक्षतोडीचे दुष्परिणाम सुरुवातीपासूनच जाणवू लागले होते. जंगलातील झाडांची तोड करण्यात आलेल्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी एक हृदयद्रावक दृश्य नागरिकांच्या निदर्शनास आले होते. दिवसभर अन्नाच्या शोधात बाहेर गेलेले असंख्य पक्षी सायंकाळी आपल्या घरट्यांकडे परतत होते. मात्र, ज्या झाडांवर त्यांची घरटी होती, ती झाडेच तोडण्यात आल्याने त्यांना आपला निवारा दिसत नव्हता.

परिणामी हे पक्षी आकाशात बराच वेळ घिरट्या घालताना दिसत होते. मानवी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे मुक्या जीवांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याचे हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

रानगाय

दरम्यान, आता पाली येथील साईडोंगर जंगल परिसरात एक रानमांजर मृतावस्थेत आढळून आल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांना वृक्षतोड झालेल्या परिसरातील एका मोठ्या तोडलेल्या झाडाजवळ ही रानमांजर मृत अवस्थेत आढळली. रानमांजरांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवास अनेकदा मोठ्या झाडांच्या पोकळ्यांमध्ये असतो.

त्यामुळे जंगलातील मोठमोठी झाडे तोडली गेल्यानंतर अशा प्राण्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, या रानमांजराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनविभागाने या घटनेची पाहणी करून योग्य तपास करणे आवश्यक आहे.

याच परिसरात आज सायंकाळी एक रानगाय गावाजवळ फिरताना दिसून आली. जंगलातील नैसर्गिक अधिवास आणि सुरक्षित निवारा धोक्यात आल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

जंगल म्हणजे केवळ मोठमोठी झाडे नव्हेत, तर असंख्य पक्षी, प्राणी, कीटक आणि जैवविविधतेचे ते एक महत्त्वाचे घर आहे. एका झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात, तर त्याच झाडाच्या पोकळीत एखाद्या वन्यप्राण्याचा निवारा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ही केवळ झाडांची कत्तल नसून, संपूर्ण परिसंस्थेवर होणारा गंभीर आघात आहे.टोरंट प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे.

मृत रानमांजराची तातडीने तपासणी करण्याची मागणी

वनविभागाने साईडोंगर परिसरातील मृत रानमांजराची तातडीने तपासणी करून मृत्यूचे कारण स्पष्ट करावे. तसेच सुरू असलेल्या वृक्षतोडीची पाहणी करून वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होण्याची गरज आहे. आज घरटी हरवलेले पक्षी आकाशात आश्रय शोधत आहेत, रानमांजर मृतावस्थेत आढळत आहे, तर रानगाय गावाच्या दिशेने फिरताना दिसत आहे. या घटना निसर्गाने दिलेला इशारा तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलच संपणार असेल, तर या जंगलातील मुक्या जीवांनी जायचे तरी कुठे? हा प्रश्न आज साईडोंगरच्या जंगलातून संपूर्ण समाजासमोर उभा ठाकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT