Karjat Revenue Office Building Pudhari
रायगड

Karjat Revenue Office Building: कर्जत तलाठी कार्यालयाचा कारभार धोकादायक इमारतीत; स्लॅब कोसळण्याची भीती

नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

आनंद सकपाळ

नेरळ: कर्जत तालुक्याचा महसूल विभागाचा कारभार ज्या पडक्या आणि गळक्या इमारतीतून सुरू आहे, त्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी खराब होऊन काही भाग पडलेला आहे, तर छतातून पावसाचे पाणी सतत गळत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी स्लॅबचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

कर्जत शहरातील नवीन प्रशासकीय भवनासमोर असलेल्या या जुन्या इमारतीत काही तलाठी आणि सर्कल कार्यालये सुरू आहेत. सातबारा उतारा, फेरफार नोंद, पिक-पाणी नोंदणी, जमीनविषयक कागदपत्रे तसेच विविध महसूलविषयक कामांसाठी तालुक्यातील गावखेड्यांतून दररोज मोठ्या संख्येने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र, कार्यालयाची दुरवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत येथे नवीन प्रशासकीय भवन उभारण्यात आले असतानाही तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यांना तेथे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तलाठी व सर्कल यांची कार्यालये अद्याप या जुन्या आणि धोकादायक इमारतीतूनच चालवली जात आहेत. तालुक्यातील काही तलाठी आणि सर्कल कार्यालये दूरच्या ठिकाणी असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारीही आहेत.

दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कारवाई करणार का, असा सवाल आता कर्जतकरांकडून उपस्थित केला जात आहे.

जीवितहानी झाल्यानंतर दुरुस्ती करणार का?

प्रशासनाच्या या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिक म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिक सातबारा, पिक-पाणी आणि इतर महसूलविषयक कामांसाठी या कार्यालयात येतात.

मात्र, कुठल्या क्षणी स्लॅब कोसळेल आणि जीवितहानी होईल, हे सांगता येत नाही. जीवितहानी झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा प्रशासनाने आताच या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी.” इमारतीच्या छतामधून होणाऱ्या गळतीमुळे कार्यालयातील कागदपत्रे भिजत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच शासकीय दस्तऐवजांच्या संरक्षणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची मागणी

महसूल प्रशासनाने या इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, धोकादायक भाग त्वरित बंद करावा आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर करावे, अशी मागणी होत आहे. तसेच तलाठी आणि सर्कल कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय भवनात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

गळक्या छताखाली शासकीय कागदपत्रे

या जुन्या इमारतीमध्ये शेतकऱ्यांची महत्त्वाची कागदपत्रे तसेच महसूल विभागाच्या नोंदी ठेवण्यात येतात. मात्र, छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने कागदपत्रे भिजण्याची आणि खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, कर्मचारी आणि कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच या इमारतीची पाहणी करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT