कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे, तिघर आणि नांगुर्ले या तीन गावांची ग्रामदेवता मानली जाणारी वरणाई माता सध्या भाविकांच्या श्रद्धास्थानाचे केंद्र बनली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली असून उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या पाठीमागील डोंगरात प्राचीन लेण्या, तसेच दगडातून कोरलेली पाण्याची टाके आजही पाहायला मिळतात. या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. यावरून पांडवांनी भ्रमंती काळात येथे वास्तव्य केले असावे, असा समज परिसरात प्रचलित आहे.
वरणाई माता नवसाला पावणारी म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. श्रद्धाळू भक्त आपली इच्छा व्यक्त करून देवीसमोर गार्हाणे मांडतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होतात, असा विश्वास आहे. सध्या मंदिर जीर्ण झाले असून परिसरातील भक्त नवे मंदिर उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच मंदिराकडे जाणार्या सुसज्ज रस्त्याची उपलब्धता करणे हे भाविकांपुढे आव्हान आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. पावसाळ्यात येथे डोंगरातून ओघळणारे धबधबे आणि वार्याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात, तर उन्हाळ्यातही येथे लोक दर्शनासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सध्या वरणाई मातेच्या उत्सवात परिसरातील गावकर्यांसह दूरदूरच्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे.