कर्जत : कर्जत तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपासून रुग्णांना मोफत रक्ततपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. मागील आठवड्यापासून सेवा अचानक बंद झाल्याने परिसरातील गरीब, आदिवासी तसेच सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थेकडून मिळणारी ही महत्त्वाची सुविधा बंद झाल्याने रुग्णांना रक्ततपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गाव-पाड्यांमधील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र आहे. डोंगराळ आणि आदिवासीबहुल भौगोलिक परिस्थितीमुळे येथील नागरिकांना उपचारांसाठी दूरवर जाणे आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासाच्या दृष्टीने कठीण ठरते.
अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली मोफत रक्ततपासणी सेवा ही गरीब रुग्णांसाठी मोठा आधार होती. मात्र, ही सेवा बंद झाल्याने रुग्णांना तपासण्यांसाठी बाहेर जावे लागत असून त्यांचा आर्थिक खर्च आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तापाचे रुग्ण तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोफत निदान सेवा उपक्रम सुरू केला. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध करून देणे, खासगी प्रयोगशाळांवरील आर्थिक अवलंबित्व कमी करणे आणि ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच निदान सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीनेही राबवली जाते. या व्यवस्थेत खासगी सेवा पुरवठादारामार्फत प्रयोगशाळा सेवा उपलब्ध करून दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रक्तनमुने संकलित करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. तसेच तपासणी अहवाल रुग्णांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे.
कळंब सारख्या आदिवासीबहुल भागात मोफत रक्ततपासणी सेवा बंद होणे ही गंभीर बाब आहे. शासन एका बाजूला ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे धोरण राबवत असताना दुसऱ्या बाजूला उपलब्ध असलेली सेवा बंद पडत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोफत रक्ततपासणी सेवा नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद झाली, ती पुन्हा कधी सुरू होणार आणि यासाठी जबाबदार कोण, याची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी करावी. बंद झालेली सेवा तातडीने पूर्ववत करावी, रक्तनमुने संकलनासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, शासनाच्या मोफत निदान सेवा योजनेतील पात्र तपासण्या नियमित सुरू ठेवाव्यात आणि आदिवासी व दुर्गम भागातील रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता घ्यावी. आरोग्य ही नागरिकांची मूलभूत गरज आहे.
शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोफत रक्ततपासणी सेवा तातडीने पूर्ववत करून आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
केंद्रातील आरोग्य अधिकारी रजेवर असल्याने “माझी या प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ दिवसांपूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मोफत रक्ततपासणी सेवा बंद होण्यामागील कारणांबाबत मला सध्या माहिती नाही.डॉ. स्वप्नील रोकडे, अधिकारी, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोफत रक्ततपासणी सेवा बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः गरीब आणि आदिवासी कुटुंबांतील रुग्णांना रक्ततपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागत आहे. त्यासाठी पैसे खर्च करण्याबरोबरच प्रवासाचा त्रासही सहन करावा लागत आहे. शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली ही सुविधा बंद राहणे योग्य नाही. आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून ही सेवा पुन्हा सुरू करावी.राहुल बदे, ग्रामस्थ कळंब