नेरळ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ममदापूर येथे धर्मावर आधारित सुकुन एम्पायर्सचे हलाल लाइफस्टाइल नामक टाऊनशीप उभारले जात असल्याची जाहिरात टाऊनशीप विकासकाने केली आहे. मात्र, त्यावरून आता मोठा वादंग निर्माण झाला असून, या प्रकरणी गंभीर दखल घेवून राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून, या प्रकरणी येत्या दोन आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान ज्या रायगड जिल्ह्यात हे टाऊनशिप उभारले जात आहे, त्या रायगड जिल्ह्याचे प्रशासन या प्रकल्पाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले असून, आजच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्जतला पोहोचले आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास संकुल प्राधिकरण अंतर्गत येणार्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत हे टाऊनशीप उभारले जात आहे. हलाल टाऊनशीप असे या टाऊनशिपचे नाव आहे. हलाल लाइफस्टाइल टाउनशिप हे केवळ मुस्लीम समुदायासाठी असल्याबाबतचा प्रचार विकासकनाने आपल्या जाहिरातीतून केला आहे. या टाऊनशिपचा एक प्रमोशनल व्हिडिओ देखील विकासकाने तयार केला असून, या व्हिडिओत सुकून एम्पायर अंतर्गत टाऊनशिप प्रोजेक्टची माहिती देण्यात आली आहे.
ही माहिती एक हिजाब घातलेली महिला देत आहे. त्यात ती समाजात राहताना आपल्याला आपली मुल्ये कॉप्रमाईज करावी लागली तर ते योग्य आहे का असा प्रश्न विचारते. त्यानंतर ती हलाल टाऊनशिपच्या वैशिष्ट्यांची माहिती देऊ लागते. संपूर्ण जाहिरात पाहिली तर ही टाऊनशिप एक विशिष्ट धार्मिक मुल्ये पाळणार्यांसाठीच आहे हे अधोरेखीत (हायलाईट) केले जात आहे.
हलाल लाईफस्टाईल टाऊनशीप बाबत माहिती बातम्यांतूनच कळते आहे. या प्रकरणी चौकशी करण्याकरिता मी स्वतः कर्जतला जात आहे. संध्याकाळी तेथे सर्व संबंधीत अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. या बाबतची चौकशी पूर्ण झाल्यावर मी माहिती देऊ शकेन. दरम्यान चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल.किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड