Karjat Farmers Crisis Pudhari
रायगड

Karjat Farmers Crisis: पावसाची दांडी; कर्जतमध्‍ये दुबार पेरणीचे संकट

पहिल्या पावसाने दिला दिलासा; आता पाऊस गायब; शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: कर्जत तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात आशादायक झाली होती. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या पावसावर विश्वास ठेवून हजारो शेतकऱ्यांनी भातासह विविध पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी नांगरणी, पेरणी आणि इतर शेतीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, उगवलेली भाताची रोपे करपू लागली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीची भीती सतावू लागली आहे. दुबार पेरणी करावी लागल्यास बियाणे, नांगरणी, मजुरी आणि इतर शेती खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. आधीच वाढत्या शेती खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे मोठे संकट उभे ठाकले आहे.

कर्जत तालुक्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने प्रत्येक दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. सध्या शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.

दरम्यान, कृषी विभागाने शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय उरणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे वाढता शेती खर्च आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता अशा दुहेरी संकटात कर्जत तालुक्यातील बळीराजा सापडला आहे. आता इंद्रराजा कधी बरसतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यातील जंगले विविध प्रकल्पांसाठी कवडीमोल भावात मोठ्या कंपन्यांच्या घशात घालण्याचे सरकारचे धोरण असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाची हानी यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्याची ओळख ही 'ग्रीन बेल्ट' आणि भरपूर पावसाचा प्रदेश अशी आहे. मात्र यंदा पावसाची अनिश्चितता आणि कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. आगामी काळात विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास कर्जत तालुक्यातील शेतीसमोर आणखी मोठे संकट उभे राहू शकते. या पुढे कर्जतच्या शेतकऱ्यांवर शेती करण्याचे मोठे संकट हे सरकारच्या चूकीच्या धोरणाचे फळीत मात्र ठरणार अससल्याची भावना आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
- यशवंत भवारे, अध्यक्ष, शेतकरी तथा मनसे कर्जत तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT