उरण : उरण परिसरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या करंजा जेटीची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, जेटीला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे प्रवासी वाहतूक धोक्यात आली असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जेटीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे, मात्र संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?“ असा सवाल नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यास या भगदाडामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.
जेटीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जेटीवर संरक्षक कठडे आणि योग्य प्रकाश व्यवस्था करावी. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत धोकादायक भागात सूचना फलक लावावेत. अशा प्रकारच्या मागण्या प्रवाशांकडून करण्यात येत असून प्रशासनाने दुर्घटनेची वाट न पाहता दुरुस्ती पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.
लाटांमुळे मोठी भेग
जेटीच्या सिमेंटच्या काँक्रीटला मोठी भेग पडली असून एका बाजूचा भाग खचला आहे. समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे आणि देखभालीच्या अभावामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे दिसून येत आहे. या जेटीवरून दररोज शेकडो नागरिक आणि कामगार प्रवास करतात. मात्र, जेटीच्या या दुरवस्थेमुळे चालताना किंवा बोटीत चढताना-उतरताना प्रवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.