Raigad Fishing Industry pudhari photo
रायगड

Raigad Fishing Industry : करंजा बंदरात सुरमई, बांगड्याची आवक वाढली; दरात घट

१०० रुपयांपासून १२00 रुपये किलोच्या दराने माशांची विक्री; खवय्यांची चांगलीच चंगळ

पुढारी वृत्तसेवा

उरण : रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित करंजा - द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदरात सुरमई, बांगडा आणि मकोल माशांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. १५ ऑगस्टपासून सुरू झालेले करंजा बंदर येथील मच्छीमारांसाठी अत्यंत लाभदायक ठरू लागले असून, करंझासह रायगड जिल्ह्यातील अनेक मासेमारी बोटींना याचा मोठा फायदा होत आहे. तसेच या व्यवसायमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होत आहेत.

मासेमारी बोटींमधून मासे बंदरात उतरवून त्यांच्या खरेदी-विक्रीला जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे नव्याने सुरू झालेल्या या मत्स्य व्यवसाय बंदरात अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी घाऊक व किरकोळ मासे खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत. संध्याकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये छोट्या करंदीपासून कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेत, हलवा, कुपा आणि बोंबील अशा तब्बल ३० ते ४० प्रकारच्या विविध माशांची विक्री होत आहे. करंजा बंदरात सध्या १०० रुपयांपासून १२00 रुपये किलोच्या दराने माशांची विक्री केली जात असून बाजारात सुरमई, कोलंबी, कुपा, पापलेट आणि कलेत या माशांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.

बंदरात सुरमई, बांगडा आणि मकोल माशांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी ७५० ते ८०० रुपये प्रति किलो विकली जाणारी सुरमई आता ४५० ते ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहे. तसेच २०० ते २२० रुपयांपर्यंत विकला जाणारा बांगडा आता १२० ते १८0 रुपयांपर्यंत खाली आला आहे. यासंदर्भात बोलताना करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी सांगितले की, "करंजा बंदरात सुरमई, बांगडा आणि मकोल या माशांची आवक वाढली असून सुरमई आणि बांगड्याचे दर कमी झाले आहेत, मात्र मकोल माशाला अद्यापही चांगला दर मिळत आहे."

सध्या बाजारात सुरमई, बांगडा, रिबन फिश (बळा) आणि मकोल हे मासे मोठ्या प्रमाणावर आढळत असले, तरी त्या तुलनेत बोंबीलचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्या सीता कोळी यांनी दिली आहे. माशांचे दर कमी झाल्यामुळे खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून करंजा बंदरात मासळी खरेदीसाठी खवय्यांची एकच गर्दी होत आहे.

  • एकीकडे सुरमई आणि बांगड्याचे दर कमी झाले असले, तरी सर्वसामान्य खवय्यांना परवडणाऱ्या बोंबीलची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वी १० ते २० रुपयांना मिळणारा बोंबील आता वाढून ४0 ते ५0 रुपयांवर पोहोचला आहे. पावसाळ्यातील मासेमारी बंदी आणि आवक कमी असल्यामुळे एकेकाळी खवय्यांना बोंबीलसाठी एका नगामागे १०० रुपयांपर्यंत मोजावे लागत होते. मात्र १५ ऑगस्टनंतर मासेमारी बंदी उठल्यानंतर सुरुवातीला बोंबीलची आवक वाढल्याने तो ५ ते १० रुपयांना मिळत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT