रायगड : जयंत धुळप
मराठा आरमाराचे अधिपती आणि अरबी समुद्रावर आपल्या अनन्यसाधारण अशा आरमारी कौशल्याने आपले अढळ वर्चस्व गाजवणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या काळात १७२६ मध्ये सुरू झालेली विजयादशमी सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा आज ३०० वर्षांनंतरही तितक्याच दिमाखात आणि निष्ठेने सांभाळली जात आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे विद्यमान वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांच्या माध्यमातून अलिबाग येथील हिराकोट किल्ल्या शेजारील त्यांच्या 'घेरिया' निवासस्थानमध्ये ही परंपरा आजही पूर्ण जोशात व पारंपरिक श्रद्धेने अबाधित राखण्यात आली आहे.
विजयादशमी : सागरी मोहिमांच्या सीमोल्लंघनाचा दिवस
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे विद्यमान वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दैनिक पुढारी शी बोलताना आंग्रेकालीन विजयादशमीचा ईतिहास उलगडून सांगीतला. ते म्हणाले, मराठा साम्राज्यात विजयादशमी हा केवळ एक सण म्हणून साजरा करण्यात येत नसे, तर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या तत्कालीन लष्करी व सागरी मोहिमांच्या प्रारंभाचा सीमोल्लंघन दिवस म्हणून त्याचे अनन्यसाधारण असे महत्व होते.
पावसाळ्यात अरबी समुद्राच्या उधाणामुळे बंदरात उभ्या असलेल्या गुराब, गलबते व पाल या मराठा आरमारातील जहाजांची डागडुजी पूर्ण करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ती पुन्हा समुद्रात उतरवली जात असत. समुद्रास शांत राहण्यासाठी नारळ अर्पण करून नाविक सीमोल्लंघन करत असे आणि जहाजे नव्या मोहिमांवर रवाना होत असत. या प्रसंगी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि कुलाबा (अलिबाग) या मुख्य आरमारी ठाण्यांवर तोफा व शस्त्रास्त्रांचे पूजन करून दर्यावर्दी सैनिक सरखेलांना मानवंदना देत असत. खऱ्या अर्थाने त्याकाळी हा दिवस म्हणजे अत्यंत चैतन्यदायी असा असायचा.
ऐतिहासिक 'घेरिया'मधील विजयादशमी सोहळा
रघुजीराजे आंग्रे यांचे निवासस्थान सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनीच वसवलेल्या अलिबाग शहरात हिराकोट या भुईकोट किल्ल्या शेजारीच असून त्याचे नाव 'घेरीया' असे आहे. या नावामागे देखील मोठा इतिहास आहे. आंग्रेकालीन 'घेरीया' म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध जलदुर्ग विजयदुर्ग होय. तत्कालीन इंग्रजी आणि पोर्तुगीज दस्तऐवजांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याचा आणि त्याच्या परिसराचा उल्लेख 'घेरीया' असा केलेला आढळतो. किल्ल्याजवळ असलेल्या 'गिर्ये' या गावाच्या नावावरून या स्थानाला घेरीया हे नाव पडलेे.सरखेल कान्होजीराजे आंग्रे, संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांच्या काळात घेरीया हे मराठा आरमाराचे प्रमुख आणि सर्वात शक्तिशाली मुख्यालय होते.
या किल्ल्याची अभेद्य तिहेरी तटबंदी, खाडीचे नैसर्गिक संरक्षण आणि समुद्राखालील छुपी भिंत यामुळे इंग्रज याला "पूर्वेचा जिब्राल्टर" म्हणत असत. सन १७५६ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे यांच्या सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्यावर केलेली प्रसिद्ध कारवाई इतिहासात 'घेरीयाची लढाई' (बॅटल ऑफ घेरीया) म्हणून नोंदवली गेली आहे. तेच ऐतिहासीक नाव रघुजीराजे आंग्रे यांनी आपल्या निवासस्थानाला देवून तत्कालिन इतिहास वर्तमानातही जिवंत ठेवला आहे. काळ बदलला तरी आंग्रे घराण्याने आपला हा लष्करी व सांस्कृतिक वारसा अत्यंत अभिमानाने जपून ठेवला आहे. आणि याच घेरीया मध्ये दरवर्षी विजयादशमी सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक विधींनुसार पार पडतो.
सरखेलांच्या शस्त्रांचे पुजन आणि सोने लुटण्याचा सोहळा
विजया दशमीच्या या मंगल दिनी साक्षात सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या वैयक्तिक वापरातील ऐतिहासिक 'गुर्ज', धोप आणि दांडपट्टा यांसारख्या अत्यंत दुर्मिळ शस्त्रांचे विधीवत पूजन केले जाते. यासोबतच भाले, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, कट्यारी, गुप्त्या, तसेच व्यायामाची पारंपरिक साधने व मुद्गल आणि आधुनिक अग्निशस्त्रांचेही पूजन करण्यात येते. शस्त्रांसोबतच मराठा सैन्याचे मुख्य बलस्थान असलेल्या अश्वांचे (घोड्यांचे) पूजन आणि धार्मिक परंपरेनुसार आपटा व शमीपत्रांचे पूजन करून सीमोल्लंघन करुन संध्याकाळी ऐतिहासिक हिराकोट तलावा शेजीरील आंग्रेकालीन राज राजेश्वरी सप्त आसरा देवी मंदिरांत जावून आरती केल्यावर सामुहिक सोने लुटण्याचा सोहळा होतो. त्यानंतर घेरीया मध्ये येवून तेथेही सामुहीक सोने लुटण्याचा सोहोळा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी १७व्या शतकाच्या अखेरीस स्थापन केलेल्या मराठा आरमाराच्या पराक्रमाची आणि स्वराज्यनिष्ठेची साक्ष आजचा हा सोहळा देतो. अलिबाग येथील 'घेरिया' निवासस्थानी दरवर्षी साजरा होणारा हा विजयादशमी उत्सव केवळ एक कौटुंबिक परंपरा नसून तो अलिबागच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या परंपरेच्या माध्यमातून शिवछत्रपती आणि सरखेल कान्होजीराजेंचा देदीप्यमान इतिहास आजही लोकमानसात अमर आणि प्रेरणादायी राहिला आहे.