पनवेल ः कामोठे शहर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 2017 च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 9 नगरसेवक निवडून आले होते, तर शेतकरी कामगार पक्षाचे 2 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निवडणुकीनंतर काही कालावधीतच शेतकरी कामगार पक्षाचे हे दोन्ही नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने कामोठ्यावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली होती. त्यामुळे कामोठे हा भाजपचा अभेद्य गड मानला जात होता.
मात्र यंदाच्या सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीत या गडाला काहीसे तडे गेले आहेत. कामोठे परिसरातील एकूण 11 जागांपैकी भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपकडून प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, दिलीप पाटील, कुसुम म्हात्रे, विकास घरत, रवींद्र जोशी, शीला भगत आणि हेमलता गोवारी हे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र उर्वरित तीन जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत भाजपच्या एकहाती वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे.
उबाठा गटाकडून मेघना घाडगे, रीतीक्षा गोवारी आणि प्रिया गोवारी या तीन उमेदवारांनी निवडणूक जिंकत कामोठ्यात आपली ठोस उपस्थिती नोंदवली आहे. विशेष म्हणजे या जागांवर झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली असून काही प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार हजारो मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपने जरी कामोठ्यात बहुमत राखले असले, तरी शंभर टक्के यश मिळवण्यात पक्षाला अपयश आले आहे.
या निकालातून कामोठ्यातील मतदारांचा बदलता कल स्पष्टपणे दिसून येतो. भाजपचा गड पूर्णतः कोसळला नसला, तरी विरोधकांनी त्यात भेग पाडल्याचे चित्र आहे. येत्या काळात कामोठे परिसरातील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची संधी मानली जात आहे, तर उबाठा गटासाठी हा आत्मविश्वास वाढवणारा विजय ठरला आहे.