नेरळ : आनंद सकपाळ
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माथेरानमध्ये त्याच्या पडसादाची सावली दिसू लागली आहे. येथील महायुतीतील घटक पक्षांनी विकास होण्याच्या दृष्टीने निवेदन देण्याचा सपाटा लावला आहे. यावरून निवडणुकीच्या आधी प्रसिद्धी मिळवून वरचष्मा दाखवण्यात येथील महायुतीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे निवडणुकी आधी निवेदनाचे शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत महायुतीत मीठाचा खडा पडणार का? की एकत्रीत येणार का? असा प्रश्न मात्र मायेरानमधील मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद बिरुदावली असलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यात होणार असल्याने, येथील प्रत्येक पक्षाने गनिमिकाव्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष हे फक्त निवेदन देऊन समाधान व्यक्त करत आहेत.
यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध पाहवयास मिळत आहे. हे शीतयुद्ध गणेशोत्सवापासून सुरू झाले असून, गणेशोत्सवात भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ यांच्याकडून सर्व गणेशभक्तांना पूजेचे साहित्य वाटप करण्यात आले, तर शिवसेनेचे शिंदे गटाचे शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याकडून प्रसाद साहित्य भेट म्हणून दिले. तर काहींनी साखर वाटपाचा तर काहींनी नारळ वाटप केल्याचे चित्र माथेरानकराना अनुभवयास मिळाले आहे.
गणेशोत्सव समाप्तीनंतर पॉइंटला जाणार्या मार्गाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून निवेदन देण्यात आले. त्यावर शिवसेना शिंदे गटाकडून निवेदन देण्यात आले. तदनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महात्मा गांधी मार्गावरील लॉर्ड सेंट्रल हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंतचा रस्ता क्ले पेव्हर ब्लॉक बसवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर भाजपने हा रस्ता त्वरित बनविण्यास सुरुवात करावी असे निवेदन दिले असता, शिवसेना शिंदे गटाकडून ही या रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसवावे असे निवेदन दिले आहे.
तसेच भाजप कडून शास्ती लावू नये म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र देण्यात आले. तर शिंदे गटाकडून ही करवाढ करू नये असे निवेदन मुख्याधिकार्यांना देण्यात आले. मात्र ही निवेदने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या दोन्ही पक्षाकडून दिली गेली पण त्याचा पाठपुरावा न करता सोशल मीडियाचा आधार घेऊन, आपण प्रसिद्धी झोतात कसे येऊ याकडे हे पक्ष पाहत आहेत. यातून मतदारांना आकर्षित करण्याचा हा नवा फंडा मात्र या महायुतीतील दोन्ही घटक पक्षाकडून वापरला जात आहे. यामुळे निवडणुकी आधी निवेदनाचे शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत महायुतीत मीठाचा खडा पडणार का? की एकत्रीत येणार का? असा प्रश्न मात्र मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या माथेरान गिरिस्थान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असून, प्रारूप प्रभाग रचना ही अंतिम टप्यात असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष निवेदनाचे शीतयुद्ध लढत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे फक्त बघ्याच्या भूमिकेत असले तरी गनिमिकाव्याने ते मतदारापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे येणार्या सार्वत्रिक निवडणुकीत निवेदनाचे फंडा चालतो का हे पाहणे मात्र होणार्या माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये औत्सुक्याचे राहणार आहे.