अलिबाग: पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी खासदार संजय पाटील यांच्याविरोधात रायगड जिल्हयातील पत्रकार संघटनांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पत्रकार संघटनांनी पोलीस विभागाला निवेदने दिली. यावेळी पत्रकारांनी खासदार संजय पाटील यांच्या व्यक्तव्याचा निषेध करीत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथितरित्या जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली होती.
या घटनेनंतर राज्यभरातील पत्रकार संघटनांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण असून खा. पाटील यांच्या व्यक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून खा. संजय पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस विभागाला निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
रायगड प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त करत अलिबागमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल पवार, हर्षद कशाळकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे सचिव ॲड. राजेश भोस्तेकर, महेंद्र दुसार, प्रणय पाटील आदी उपस्थित होते.
पोलादपूर प्रेस क्लबच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचेविरोधात कारवाईसाठी पोलादपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल मोरे, पोलादपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश कदम व अन्य पत्रकार उपस्थित होते.
निवेदनाद्वारे पत्रकारांशी अशा प्रकारची अरेरावी व धमकीची भाषा वापरणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पत्रकारांना धमकावण्याच्या प्रवृत्तींना आळा बसेल, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात निर्भयपणे काम करता यावे यासाठी विद्यमान पत्रकार संरक्षण कायदा आणखी बळकट करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
नेरळ पोलीस स्टेशन, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कर्जत प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त करत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांना निवेदन सादर केले. यावेळी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते रायगड प्रेस क्लबचे सचिव दर्वश पालकर, आदी उपस्थित होते.
रोहा प्रेस क्लबच्या वतीने खा.संजय पाटील यांच्या वक्तव्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या असून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खालापूर प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्यावतीने तीव्र शब्दात २६ जून रोजी निषेध केला आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खा.संजय पाटील यांच्यावर कडक कारवाई करून खासदारकी रद्द करावी अशा मागण्यांचे निवदेन खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहूल पाटील, पोलिस निरिक्षक सचिन पवार यांच्याकडे निवेदन दिले आले आहे.
याप्रसंगी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओव्हाळ, आदी पत्रकार उपस्थित होते.
महाडमधील सर्व पत्रकारांनी एकत्रितपणे निषेध केला असून यासंदर्भात लेखी निवेदन महाड पोलीस ठाण्यात देण्यात आले असून खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, आदी उपस्थित होते.
लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहातातील खासदार पत्रकारांना धमकाविण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते लोकशाहीला घातक आहे. पत्रकार लोकप्रतिनिधींना जाब विचारू शकत नसतील तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळणार? म्हणूनच संजय पाटील यांची खासदारकी रद्द करावी.- प्रशांत गोपाळे, अध्यक्ष, रायगड प्रेस क्लब, रायगड