रायगड | देशातील महत्वाच्या बंदरांमधील जहाजाच्या कार्यपूर्तीचा सरासरी वेळ (टर्न अराउंड टाइम) सन 2013-14 मध्ये लागणार्या 93.59 तासांवरून खाली येऊन सन 2023-24 मध्ये 48.06 तासांवर आला आहे. म्हणजेच या वेळात 48.65टक्के बचत झाली आहे. हा टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान देशातील या बंदरांमध्ये रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदराचा टर्न अराउंड टईम सर्वात कमी म्हणजे 26 तास आहे.
सरकारने केलेल्या या विविध उपाययोजनांमध्ये नवीन बर्थ (जहाज उभे करण्याची जागा ), टर्मिनल्स, पार्किंग प्लाझा बांधणे, सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्सचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण करून त्यांना अधिक फायदेशीर बनवणे, डिजिटॅलिकरणमार्फत विविध प्रणालींना अधिक कार्यक्षम बनवणे, बंदरापासून दूर असलेल्या प्रदेशांशी दळणवळण सुधारण्यासाठी रेल्वे व रस्त्यांचे जाळे तयार करणे आदींचा समावेश आहे.
महत्वाच्या बंदरांमध्ये जहाजांना बर्थ चे वाटप करणे व जहाजांचा अनुक्रम ठरवणे यासाठी मंत्रालयाने जारी केलेल्या बर्थिंग धोरणाचा आधार घेतला जातो. महत्वाच्या बंदरांवरील पायाभूत सुविधांचा विकास व क्षमतावर्धन ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. यात नवीन बर्थ व टर्मिनल्स बांधणे , सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्स चे यांत्रिकीकरण करणे, मोठ्या आकाराच्या जहाजांना आकर्षित करण्यासाठी ड्रेजिंग करून बंदराजवळच्या समुद्राची खोली वाढवणे, रस्ते व रेल्वेचे जाळे उभारणे आदि कामे करण्यात आली आहेत. या बाबतची माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी नुकतीच राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली आहे.
जेएनपीए बंदरातीत 100 टक्के मालहाताळणी पैकी 90 टक्के कंटेनर आणि 10 टक्के लिक्विड कार्गोचा समावेश आहे. कंटेनर अपलोड, डाउनलोड करिता अत्याधूनिक यंत्रणेसह प्रशिक्षित मनुष्यबळ कार्यरत आहे.अपलोड, डाउनलोड करिता कोणत्याही प्रकारे विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात येते. परिणामी टर्न अराउंड टाइम कमी राखणे शक्य झाले आहे.उन्मेष वाघ, अध्यक्ष, जेएनपीए पोर्ट