JNPA Boat Service File Photo
रायगड

JNPA Boat Service: पावसाळ्यामुळे जेएनपीए-मुंबई जलवाहतुकीच्या मार्गात बदल; वेळ,पैशांची मोठी बचत

आता गेट वे ऑफ इंडियाऐवजी भाऊचा धक्का येथून बोटी धावणार

पुढारी वृत्तसेवा

उरण: पावसाळ्यात खवळणारा समुद्र, वादळी वारे आणि उसळणाऱ्या महाकाय लाटांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या जलवाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

जेएनपीए बंदर ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) दरम्यान चालणारी नियमित प्रवासी बोट सेवा पावसाळ्याच्या कालावधीपुरती भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून चालवली जाणार आहे, अशी माहिती जेएनपीए जलवाहतूक विभागाचे कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली. ही तात्पुरती व्यवस्था 1 जून ते 30 सप्टेंबर पावसाळा संपेपर्यंत लागू राहील आणि त्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत केली जाईल.

गेल्या 37 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली जेएनपीए ते मुंबई जलवाहतूक सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रात 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने गेट वे ऑफ इंडिया येथे बोटी लावणे धोक्याचे ठरते.

प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी (एलिफंटा) या मार्गावरील जलसेवा पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतात. उरणमधील मोरा ते मुंबई ही जलवाहतूक बारमाही सुरू असते, त्याच धर्तीवर जेएनपीए ते मुंबई जलवाहतूकही बंद न करता केवळ तिच्या मार्गात सुरक्षित बदल करण्यात आला आहे.

सध्या रस्ते वाहतुकीवरील ताण आणि जागोजागी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, जेएनपीए ते मुंबई हा जलमार्ग अत्यंत सोयीचा ठरला आहे. रस्त्याने प्रवासासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत असताना, केवळ 1 तासात विनाअडथळा आणि प्रदूषणमुक्त प्रवास या जलमार्गामुळे शक्य होतो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होते.

जलवाहतूक सेवा जीवनवाहिनी ठरली

या जलवाहतूक सेवेचा सर्वाधिक फायदा जेएनपीए बंदरातील कामगार, अधिकारी, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होतो. प्रवाशांच्या सोयीसाठी जेएनपीए कामगार वसाहतीमधून थेट जेएनपीए लँडिंग जेटीपर्यंत दर तासाला विशेष बस सेवा देखील उपलब्ध करून दिली जाते.

जेएनपीए प्रशासनातर्फे ही सेवा अतिशय अल्प दरात (किफायतशीर शुल्कात) उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे बंदरावर आधारित उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही जलवाहतूक सेवा जीवनवाहिनी ठरली आहे. मार्गात बदल झाला असला तरी प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा दोन्ही राखण्यास जेएनपीएने प्राधान्य दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT