नाते : इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्याच्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पाचाड येथील राजवाड्याची केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत साफसफाई करण्यात आल्याचे चित्र या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता निदर्शनास आले.
जून मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान पाचाड येथील राजवाड्या संदर्भात स्थानिक शिवभक्तांनी शासनाकडे या राजवाड्याची स्वच्छता व पुनर्निर्माणाची मागणी केली होती.
किल्ले रायगडावरील हवा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना सहन होत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावात गडकोट राजवाड्याची निर्मिती केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी याच पाचाड येथील राजवाड्यात आपला देह ठेवला होता.
स्वातंत्र्यदिनी आज किल्ले रायगड परिसरात प्रत्यक्ष भेट दिली असता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या राजवाड्यातील सर्व ठिकाणचे वाढलेले गवत साफ केल्याचे दिसून आले. या राजवाड्याकडे जाणारा मार्ग देखील स्वच्छ करण्यात आला असून या ठिकाणी श्री गणेशोत्सव दरम्यान येणार्या हजारो शिवभक्तांना आता राजवाड्यामध्ये जाऊन राजवाड्याची पाहणी करणे शक्य होणार आहे.
केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत किल्ले रायगड व परिसरातील मुख्य असणार्या राजवाड्यांचे जतन व संवर्धन केले जाते.पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा राजवाडा हा अनेक वर्षापासून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. तथापि या राजवाड्याकडे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवभक्तंकडून करण्यात येत होता.
किल्ले रायगडावर सुरू असलेल्या विविध राजवाडयांच्या जतन व संवर्धनाप्रमाणेच या राजवाड्याचेही जतन व संवर्धन करावे अशी मागणी शिवभक्तांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.