महाड : देवी जाखमाता महाड( Jakhmata Mahad) शहराची ग्रामदेवता आहे. पुरातन काळापासून ते अगदी शिवकाळापर्यंत या देवीच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये सापडतात. खरे तर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत.
जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्य कलेच्या नावाशी साधर्म्य असलेला शब्द जखडणे या शब्दाच्या व्युत्पत्तीतून आला आहे, त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी ही देवी असू शकते असा तर्क आपल्याला काढता येतो किंवा तत्कालीन जाखडी नृत्य करणारा वर्ग या देवीची म्हणजेच या शक्तीची पूजा करणारा असावा असाही तर्क काढता येतो. पण याला तसा कागदोपत्री पुरावा नसल्याने तसा खळ करणे चुकीचे ठरेल. पण आजही या देवीचे महात्म्य भक्तांच्या रोजच्या येण्याने अधोरेखीत झाले आहे असे जरूर म्हणावे लागेल.
महाडमधील हे जाखमातेेचे पाषाणरुपी देवस्थान महाडच्या इतिहासकालीन कोट किल्ल्याच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारापाशीच आहे. हेमाडपंथीय बांधकाम असलेल्या छोट्याशा मंदिराभोवती सभामंडप घातल्याने या मंदिराचे भव्य स्वरूप दिसते.
तसे जाखमाता हे यक्षिणीचा अवतार असल्याने व्यापारी वर्गाची ही देवी असेही हिला संबोधले जाते आणि तसा पुरावा म्हणजे पुरातन वैश्यवाणी या व्यापार करणा-या समाजातील अनेक कुटुंबांची ही कुलदैवत आहे आणि व्यापार आणि महाड शहर हेही नाते पुरातनच आहे.
महाबळेश्वरच्या एका आर्थर पाईंट या घाटमाथ्यावरून उगम पावलेली सावित्री नदी ही घाट आणि कोकण यांच्यातील व्यापा-याची साक्षीदार आहे. याच नदीला मधुनदी म्हणजेच रिव्हर आफ हनी असे ब्रिटीशकाळात म्हणायचे. घाटमाथ्यावरील मधाचा व्यापार या नदीतून कोकणात व्हायचा. आणि महाड हे बंदर याच सावित्रीच्या समुद्रपातळीवरच्या काठावर वसले आहे. महाड हा शब्द महाहाट याच शब्दापासून म्हणजे मोठी बाजारपेठ असा अर्थाने रूढ झाला आहे. 1638 मध्ये आलेल्या डी कॅस्ट्रो या फ्रेंच प्रवाशाने देशातील गव्हाची फार मोठी उलाढाल महाडच्या या बंदरातून होत होती अशी नोंद केलेली आहे. म्हणूनचे जिथे व्यापारपेठा तिथे जाखमाता असे समीकरण कोकणात पाहायला मिळते. अशाच जाखमातेचे एक रूप महाडच्या ग्रामदेवतेशी नाते सांगणारे आहे.
महाडची ही जाखमाता महाडचे ग्रामदैवत विरेश्वर महाराजांची बहीण असून विन्हेरेची झोलाई, महाडची कोटेश्वरी या बहिणी असल्याचे सांगितले जातात. त्याचा प्रत्यय महाशिवरात्रीच्या छबिना या उत्सवात दिसून येतो. देव देवस्थाने या संज्ञा दिवसेंदिवस डिजीटल युगामुळे पडद्याआड होताना दिसत असल्या तरी त्या देवांचे नातेसंबंध व त्यातून निर्माण झालेले उत्सव या गोष्टी खुपच कुतुहलाच्या आणि आश्चर्यकारक असतात. अनेकजण वेळप्रसंगी नास्तीकाचा मुखवटा घालून वावरल्यामुळे या कुतुहलाच्या रंजक कथांचा त्यांना उलगडा होत नाही.
त्यामुळे खरे तर या कथा, उत्सव आणि समाजाच्या अर्थकारणाची मुळे यांचा खोल अभ्यास झालेला नाही. हे सण, उत्सव, त्या रंजक कथा आहेत म्हणून कोकणातील शेतकरी मंदीतही तरतो हे आता अनेकांना पटले आहे. अशाच नातेसंबंधातून महाडच्या छबिन्याच्या जत्रेत लाखोंच्या संख्येने वाढ होत आहे.
विरेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ट्रस्टचे सरपंच व पंच कमिटी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. नानासाहेब पेशव्यांच्या काळात यशवंतराव पोतनीस हे रायगडाचे सुभेदार होते. त्यांनी विरेश्नर मंदिराच्या जीर्णोद्धाराबरोबरच हेमाडपंथीय मंदिरात जाखमातेची स्थापना केली. पाषाणरूपी या जाखमातेची नित्य पूजा केली जाते. काही वर्षापूर्वी जाखमाता नवरात्र उत्सव मंडळाने वर्षभर देवीचा मुखवटा बसवून एक परिवर्तनाची सुरूवात केली. तशी या देवीने परिवर्तनास परवानगी दिल्याचे अनेक दाखले आहेत. आज दिसणारे मंदिरवजा सभामंडप हे याच परिवर्तनाचा एक भाग आहे.