रायगड : जयंत धुळप /श्रीकृष्ण बाळ
महाड तालुक्यातील तळीये आणि खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या दोन गावांवर निसर्गाने केलेल्या आघाताला अनुक्रमे चार आणि दोन वर्षे उलटली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये आपली माणसे, घरे आणि सर्वस्व गमावलेल्या आपद्ग्रस्तांचे दुःख आजही संपलेले नाही. शासकीय घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दिरंगाईमुळे पुनर्वसन प्रक्रिया रखडली आहे. तळीयेत अद्याप अनेकांना हक्काची घरे मिळालेली नाहीत, तर इर्शाळवाडीत घरे मिळाली असली तरी रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन्ही गावांमध्ये प्रशासकीय लाल फितीचा अडथळा कायम आहे.
22 जुलै 2021 रोजीच्या काळरात्री तळीये गावावर दरड कोसळून 87 जणांचा बळी गेला. यानंतर शासनाने 271 आपद्ग्रस्त कुटुंबांना म्हाडामार्फत घरे बांधून देण्याची घोषणा केली. मात्र, चार वर्षे उलटूनही केवळ 66 कुटुंबांनाच घरांचा ताबा मिळाला आहे. उर्वरित 205 कुटुंबे आजही आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. धक्कादायक म्हणजे ही उर्वरित घरे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे म्हाडाने कळवले आहे. या कुटुंबांना यंदाचा पावसाळाही दरडीच्या धोक्याखालीच काढावा लागणार आहे.
घरांची अपूर्ण कामे : 271 पैकी 136 घरांचे काम अद्याप पायाच्या पातळीवरच आहे.
तयार घरे हस्तांतरित नाही : तब्बल 69 घरे बांधून तयार असली तरी, ती आपद्ग्रस्तांना सुपूर्द करण्यात आलेली नाहीत.
ग्रामस्थांचा नकार : स्थलांतरित होणार्या 205 कुटुंबांची मागणी आहे की, नव्या वसाहतीत मूळ गावाप्रमाणेच समाजनिहाय घरांची रचना असावी. सर्व घरे पूर्ण झाल्यावरच ताबा घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सुविधांचा अभाव : गेल्या वर्षी हस्तांतरित झालेल्या 66 घरांना वर्षभरानंतर वीजपुरवठा मिळाला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू झालेली नाही.
तीन वर्षांनंतर नवीन घरात प्रवेश केला, तेव्हा डोळ्यांत फक्त अश्रू होते आणि आपत्तीत गमावलेल्या कुटुंबीयांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. या घरात आता आई-वडिलांचे आशीर्वाद मिळणार नाहीत, ही खंत कायम राहील.किशोर पोळ, तळीये दरडग्रस्त
कोकणातील धोका : कोकणात एकूण 940 गावे दरडीच्या धोक्याखाली असून, यापैकी 636 गावांना तीव्र धोका आहे. सर्वाधिक 392 गावे रायगड जिल्ह्यात आहेत.
तळीयेची स्थिती दुर्घटना : 22 जुलै 2021, मृत्यू : 87
एकूण बाधित कुटुंबे : 271
घरे मिळाली : 66 (4 वर्षांनंतर)
घरांच्या प्रतीक्षेत : 205 कुटुंबे
इर्शाळवाडीची स्थिती
दुर्घटना : 19 जुलै 2023, मृत्यू/बेपत्ता: 84
एकूण बाधित कुटुंबे : 43 (सर्वांना घरे मिळाली)
मुख्य अडचण : 15 तरुण दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत.
इर्शाळवाडी : घरे मिळाली; पण रोजगाराचा प्रश्न गंभीर
19 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडीवर दरड कोसळून 84 जणांचे आयुष्य संपले. येथील 43 बाधित कुटुंबांना सिडकोमार्फत घरे बांधून देण्याचे काम वेगाने झाले. सहा महिन्यांत घरांचे आश्वसन दिले होते, प्रत्यक्षात वर्षभरात घरे मिळाली. मात्र, येथील मुख्य समस्या रोजगाराची आहे. घटनेनंतर बाधित कुटुंबांतील तरुणांना नोकरी देण्याची घोषणा झाली होती. त्यानुसार 13 तरुणांना नोकरी मिळाली. पण दोन वर्षे उलटत आली तरी उर्वरित 15 तरुण आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेत ते रोज मिळेल ते काम करत आहेत. शासनाने या तरुणांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी जोर धरत आहे.