खोपोली (रायगड) : प्रशांत गोपाळे
दोन वर्षांपूर्वी येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळ्याने अनेक माणसे ढिगार्याखाली गाडली गेली होती. डोळ्यादेखत अनेकजण हे दरडखाली गाडले गेले. काळीज पिळवटून टाकणार्या प्रसंगाला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शनिवारी (19 जुलै रोजी) आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमाला खालापूर तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह शासकीय अधिकार्यांनी दांडी मारली. तसेच राजकीय पुढार्यांनीसुद्धा पाठ फिरवल्याचे दिसून आले.
19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा भेट घेवून दरडग्रस्तांना नोकरी आणि मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षात तेही हवेत विरून गेले. त्याबद्दल दरडग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तर तत्कालीन तहसिलदार आयुब तांबोळी हेच आमचे मायबाप होते असे सांगत अश्रू अनावरण झाले. दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठीचा ओघ फक्त फोटो सेशनसाठी होता असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
इर्शाळवाडीचा डोंगर 19 जुलै 2023 रोजीच्या रात्री कोसळून भूस्खलन झाल्याने आणि 84 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. घरे, जनावरे सर्व मातीखाली गाडले गेल्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दुर्घटना घडल्यानंतर वर्षभर तहसिलदार आयुब तांबोळी, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी पालकत्व स्वीकारून पक्की घरे उभारण्यासाठी काम केले. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकवेळा भेट घेवून कुटूंबांना धीर देत रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. इर्शाळवाडी दरडग्रस्त गावात घरे बांधली. पाणी, रस्ता, वीज दिली, मात्र रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
दुसरे वर्ष पूर्ण होत असताना दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहण्याच्या कार्यक्रमासाठीचे निमंत्रण शासकीय अधिकार्यांना देण्यात आले असताना दांडी मारली आहे. तर यावर्षी श्रद्धांजली वाहण्यासाठी खालापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उप निरीक्षक विशाल पवार, अशोक जगताप, पोलिस दिनेश भोइर, देवेंद्र शिंनगारे, बबन घुले, शरद हिवाळे, अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर तसेच नेताजी पालकर मंडळ चौकचे संघटक यशवंत सकपाळ, रंजना साखरे, अशोक मोरे, बन्सी घेवडे, अनंता पवार, फिरोझ शेख, हर्षल हनुमंते, आनंद गायकवाड, महाराष्ट्र दुर्ग पर्यटन संस्था अध्यक्ष रूपेश तरल, प्रवीण पाटील, श्रेयस सकपाळ, विजय ठोसर, स्वप्निल सोनटक्के, अंकुश वाघ, गणपत पारधी, सुनील पारधी, भगवान भवर, सचिन पारधी, मंगळू पारधी, महादेव सुतक, कमलू पारधी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नेताजी पालकर मंडळ चौकच्या वतीने रामा पारधी, अशोक भुतबरा, वामन भुतबरा, गणेश भवर, अंजनी भवर, नरेश पारधी, किसन वाघ, पर्वत पारधी या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनीही मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना धीर दिला आहे. मात्र इर्शाळवाडीमधील नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा भेट घेवून नोकरी आणि मदतीचे आश्वासन दिले होते ते पूर्ण न झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.