18 हजार गोदीबंदर कामगारांच्या वेतनामध्ये वाढ Pudhari Photo
रायगड

18 हजार गोदीबंदर कामगारांच्या वेतनामध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए ः देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न झाला.या यशस्वी करारामुळे गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी बंदर व गोदी कामगारांच्या वेतन करारासंदर्भात झालेल्या चर्चेत केंद्रीय बंदर व जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली. मागील तीन वर्षांपासून वेतन करार प्रलंबित होता. यासाठी कामगारांनी देशव्यापी संपाची हाक दिली होती.

नवी दिल्ली येथे बुधवारी पार पडलेल्या बैठकीत आय.पी.ए.चे व मुंबईचे पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा, मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल आणि सहा कामगार महासंघाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बंदर कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढीस मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2026 अखेर पाच वर्षांच्या या वेतन करारात 32 महिन्यांचा फरक कामगारांना मिळणार असून 500 रुपये विशेष भत्ता आणि 30 टक्के व्ही.डी.ए. देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कामगारांच्या हिताच्या आणि जिव्हाळ्याच्या वेतन कराराच्या सामंजस्य करारावर या बैठकीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. वेतन कराराची ही आठवी बैठक होती.

वेतन करार घडवून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील व इतर पाच फेडेरेशनचे प्रमुख नेते पी. एम. मोहम्मद हनीफ, एस. के. शेट्ट्ये, सी. डी. नंदकुमार, नरेंद्र राव, प्रभात सामंतराय, बी. मासेन, इंडियन पोर्ट्स असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटाजी (भा. प्र. से.), मॅनेजिंग डायरेक्टर विकास अरवाल , देशातील प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, केंद्रीय श्रम आयुक्त सुनील माळी यांच्या उपस्थितीत वेतन करारावर मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये शुक्रवारी (27 सप्टेंबर) सह्या करण्यात आल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT