सुक्या मासळीचे भाव वधारले 
रायगड

Raigad News | रायगडमध्ये उत्पादन घटल्याने सुक्या मासळीने फोडला घाम

परतीचा पाऊस लांबल्याने भाव अजूनही उतरेना; सुकटीसह सुक्या बोंबलांना मागणी

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

पावसाळ्यापासून सुक्या मासळीचे भाव वधारलेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात भाव उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र परतीचा पाऊस लांबल्याने सुक्या मासळीचे भाव अजूनही खाली उतरलेले नाहीत. त्यामुळे खवय्यांचे मात्र हाल होत आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात अनेकांनी सुकी मासळी साठवण करून ठेवली होती. आता पावसाळा सरला असून साठवण केलेली मासळी देखील संपली आहे. मात्र मागील चार ते पाच महिने मासळी सुकविण्यात आली नसल्याने सुकी मासळीची कमतरता आहे. त्यामुळे बाजारात सुकी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय सध्या उपलब्ध असलेली मासळी ही मे महिन्यात सुकवलेली आहे. सध्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासे मिळत आहेत. मात्र परतीचा पाऊस लांबल्याने ऑक्टोबर महिन्यात मासळी सुकविण्यास पोषक वातावरण नव्हते. परिणामी सुक्या मासळीची कमतरता अधिक आहे. परिणामी जून महिन्यापासून सुक्या मासळीचे वधारलेले भाव अजूनही स्थिर आहेत.

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल आहेत. त्यांना येथील समुद्रातील ताज्या मासळी बरोबरच सुक्या मासळीची देखील क्रेझ आहे. येथून सुकी मासळी स्वस्त भावामध्ये खरेदी करून नेतात. जिल्ह्यासह पुणे-मुंबई या शहरातील पर्यटक व नागरिक आवर्जून येथून खरेदी करून घेऊन जातात. तर काहीजण भेट म्हणून देखील देतात. मात्र सुक्या मासळीचे वधारलेले भाव आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली सुकी मासळी यामुळे येथील पर्यटकांचा हिरमोड होत आहे. जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल असते.

आठवडे बाजारामध्ये साधारणतः सुकी मासळी स्वस्त मिळते. मात्र सध्या आठवडा बाजारामध्येही सुकी मासळी महाग मिळत आहे. तसेच सुक्या मासळीचा दर्जा देखील म्हणावा तसा चांगला नाही. गावागावांत डोक्यावर टोपलीत सुकी मासळी घेवून विक्रीसाठी फिरणार्‍या विक्रेत्या सुद्धा अजून दिसत नाही आहेत. या मासळी विक्रेत्यांकडून अनेक लोक परवडणार्‍या किंमतीमध्ये आपल्या दारा समोरच सुकी मासळी खरेदी करतात. मात्र सध्या या सुक्या मासळी विक्रेत्या देखील दाखल झाल्या नाहीत.

पेडली सुक्या मासळीचे हब

पाली-खोपोली राज्य महामार्गावर पेडली या गावी सुकी मासळी विक्रेते केंद्रित झाले आहेत. सध्या या ठिकाणी सुक्या मासळीची सात दुकाने आहेत. त्याचबरोबर या मार्गावर चीवे येथे देखील सुकी मासळी विक्रेते बसतात. त्यामुळे पुणे व मुंबई कडे जाणारे प्रवासी व पर्यटक आवर्जून या ठिकाणी थांबून चांगल्या दर्जाची सुकी मासळी खरेदी करतात. त्यामुळे पेडली हे सुक्या मासळीचे हब झाले आहे. इतर ठिकाणी मिळणार्‍या मासोळी पेक्षा या ठिकाणी मुबलक विविध दर्जाची मासळी मिळते तेही योग्य दारात.

सुकी मासळीचे भाव प्रतिकिलो

1) साधे सोडे - 1200 ते 1500 रुपये किलो. 2) उच्च दर्जाचे सोडे - 1800 ते 2200 रुपये किलो. 3) बांगडा - 20 व 25 रुपये 1 नग 4) अंबाडी - 400 व 500 रुपये किलो. 5) सुका जवला - दर्जानुसार 350 व 400 रुपये किलो 6) मोठे बोंबील - चांगल्या दर्जाचे 500 व 600 रुपये किलो. 7) छोटे बोंबील - 500 रुपये किलो. 8) साधी सुकट - 200 व 250 रुपये किलो. 9) माकुल - 600 रुपये किलो. 10) पांढरी मोठी वाकटी - साधी 500 चांगली 650 रुपये किलो. 11) छोटी वाकटी - 250 व 300 रुपये किलो. 12) मांदेली - 250 रुपये किलो.

13) मासे सुकट (खारे) - दर्जानुसार 400, 500 व 600 रुपये किलो. 14) रेपटी - 360 ते 400 रुपये किलो 15) सुरमई - 600 ते 800 रुपये किलो

पावसाळ्यापासून वाढलेले सुक्या मासळीचे भाव अजूनही तसेच आहेत. कारण सुक्या मासळीची कमतरता आणि लांबलेला पाऊस याचा परिणाम झाला आहे. भाव वाढले असले तरी ग्राहक आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात. पुणे मुंबईकडे जाणारे प्रवासी व पर्यटक तसेच स्थानिक नागरिक ही खरेदी करतात. ग्राहकांना उत्तम दर्जाची सुकी मासळी योग्य दरात पुरवतो.
- सुनील सावंत, सुकी मासळी विक्रेता, पेडली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT