Illegal Passenger Transport Pudhari
रायगड

Illegal Passenger Transport: खोणी-तळोजा मार्गावर जीवघेणी प्रवासी वाहतूक; रायते दुर्घटनेचा विसर

कारवाई थंडावताच बेकायदा प्रवासी वाहतुकीला पुन्हा ऊत

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: कल्याण-नगर महामार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाने काही दिवस धडाकेबाज कारवाईचा दिखावा केला होता.

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी, दंडात्मक कारवाई आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर ही मोहीम थंडावल्याचे चित्र असून, पुन्हा एकदा रस्त्यांवर जीव धोक्यात घालणारी वाहतूक सुरू झाली आहे.

अंबरनाथ तालुक्यातून जाणाऱ्या खोणी-तळोजा महामार्गावर दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या मार्गावर अपघातांचे प्रमाण आधीच चिंताजनक असताना अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करत असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. काही वाहनांमध्ये प्रवाशांना जीव धोक्यात घालून बसविले जात असून, सामानासह धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे.

रायते दुर्घटनेतून कोणताही धडा न घेता सुरू असलेल्या या बेजबाबदार वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, नियमभंग करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करावेत आणि संबंधित वाहनांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आणखी एखादी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांनी परिस्थिती जैसेथे

विशेष म्हणजे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांची नजर पडत असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते आणि काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT