श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृत बॉक्साईट उत्खननाचा सुळसुळाट 
रायगड

Raigad News : श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृत बॉक्साईट उत्खननाचा सुळसुळाट

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची वाताहत; महसूल व परिवहन यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

भारत चोगले

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात पावसाळा संपताच पुन्हा एकदा अनधिकृत बॉक्साईड उत्खनन व त्यासोबत अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या उत्खननातून काही घटक आर्थिक लाभ मिळवत असले, तरी त्याची गंभीर किंमत पर्यावरण, सामान्य नागरिकांचे जीवित आणि तालुक्याच्या शाश्वत विकासाला मोजावी लागत आहे.

खनिज उत्खननाबाबत केंद्र व राज्य शासनाने खनिज (विकास व नियमन) अधिनियम, 1957, पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 तसेच संबंधित नियमांद्वारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली आहेत. उत्खननासाठी वैध परवाना, पर्यावरणीय मंजुरी, नियंत्रित ब्लास्टिंग, उत्खननानंतर पुनर्भरण व वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. मात्र श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या बॉक्साईड उत्खननात या कायदेशीर तरतुदींचे पालन होत नसल्याचे स्थानिक पातळीवर जाणवते.

डोंगराळ परिसरात खोलवर ड्रिलिंग करून स्फोट घडवले जात असून, उत्खननानंतर खड्डे बुजवणे अथवा पुनर्लागवड केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर पोकळी निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साठल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढत चालला आहे. केरळमधील वायनाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे दुर्लक्ष भविष्यात गंभीर संकटाला निमंत्रण देणारे ठरू शकते, असा इशारा जाणकार व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये अशी भावना आहे की, बॉक्साईड वाहतुकीशी संबंधित काही घटकांना राजकीय आश्रय लाभत असल्याने कारवाईची धार बोथट होत आहे. ब्लास्टिंगनंतर सुरक्षा कुंपण, चेतावणी फलक किंवा संरक्षक उपाययोजना नसल्यामुळे मानवी तसेच पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

याचबरोबर क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन चालणारी अवजड वाहतूक ही तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे. घाट रस्त्यांवर भरलेले ट्रक संथ गतीने चढत असल्याने वाहतूक कोंडी होते, तर रिकामे झाल्यानंतर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काही वेळा जीवितहानीदेखील झाली आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मेघरे, सायगाव, कुरवडे, खुजारे आदी गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बॉक्साईड उत्खनन झाले असून, पुढील काळात त्याचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीवर्धन तालुका हा कोकणातील महत्त्वाचा पर्यटन परिसर असून, येथील निसर्गसौंदर्य व शांत वातावरणामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र अशाच प्रकारे अनियंत्रित उत्खनन व अवजड वाहतूक सुरू राहिल्यास पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या विषयाची दखल घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने जिल्ह्यातील पर्यावरण, नागरिकांचे जीवित आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साईड उत्खननासंदर्भात पर्यावरणीय मंजुरी, उत्खनन व वाहतूक परवाने तसेच महसूल व परिवहन विभागांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेऊन, गरज भासल्यास जिल्हास्तरीय चौकशी समितीमार्फत वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना अवजड वाहतुकीमुळे होणारा धोका, धुळीमुळे उद्भवणारे आरोग्य प्रश्न आणि वस्ती परिसरातून सुरू असलेली वाहतूक लक्षात घेता, महिला व बालविकास मंत्री या नात्याने आदिती तटकरे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम, खनिज (विकास व नियमन) अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची खातरजमा केल्यास, श्रीवर्धन तालुक्यातील अनधिकृत उत्खनन व अवजड वाहतुकीवर निश्चितच नियंत्रण मिळू शकते, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT