पनवेल : नवी मुंबईतील कामोठे वसाहती जवळ सायन पनवेल महामार्गाच्या शेजारी १२ वीच्या उत्तरपत्रिकेचा एक बंडल रस्त्यावर सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व उत्तरपत्रिका २८ मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षांच्या आहेत. विशेष म्हणजे काही उत्तरपत्रिका या फाटलेल्या अवस्थे मध्ये आढळून आल्या आहेत. परीक्षांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता पसरली आहे.
मनसेच्या महिला पदाधिकारी स्नेहल बागल यांना हे सर्व उत्तरपत्रिकेचे संच उघड्यावर पडलेले दिसून आले आहे. बागल या काही कामानिमित्ताने सायन पनवेल महामार्गावरील कामोठे बसस्टॉप जवळ आल्या होत्या. त्या दरम्यान हवेच्या जोरामुळे रस्त्यावर काही पेपरचे तुकडे बागल यांना उडताना दिसून आले. हे पेपर कसले आहेत. हे पाहण्यासाठी स्नेहल बागल यांनी जवळ जाऊन कागदाचे पेपर पाहिल्या नंतर हे नुकत्याच पार पडलेल्या १२ वीच्या उत्तरपत्रिका असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही पेपर हातात घेतल्या नंतर, त्यांनी परिसरात अन्य पेपरची शोधा शोध सुरू केल्या नंतर मातीच्या ढिगाऱ्या शेजारी उत्तर पत्रिकेचे जवळपास एक बंडल बागल यांना आढळून आले.
हे बंडल पाहिल्या नंतर स्नेहल बागल यांनी या घटनेची माहिती कामोठे पोलिसांना दिली. हे सर्व उत्तर पत्रिकेचे बंडल घेऊन त्यांनी कामोठे पोलिस ठाणे गाठून या सर्व प्रकारची माहिती कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांना दिली. बिडवे यांनी वेळ न घालवता, या उत्तरपत्रिका कोणाच्या याचा शोध घेण्यास सुरुवात झाल्या नंतर कामोठे वाहतीमधील एका शिक्षकाकडून या उत्तर पत्रिका गहाळ झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाली आणि या उत्तर पत्रिका गहाळ झाल्याची माहिती त्या शिक्षकाने मुंबई बोर्डाला कळवली होती. मात्र अशा पद्धतीने उघड्यावर १२ विच्या उत्तरपत्रिका मिळून आल्याने खळबळ माजली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका मिळाल्या आहेत त्याचे भवितव्य अंधारात तर राहणार नाही ना असा प्रश्न मनसे महिला पदाधिकारी स्नेहल बागल यांना पडला आहे.
सत्याग्रह कॉलेजचे शिक्षक बळीराम शिंदे हे, १२ वीचे पेपर तपासणी साठी घेऊन जात असताना, पिशवीतील एक बंच सायन पनवेल महामार्गावरील कामोठे वसाहती जवळील पार्थ हॉटेलच्या जवळील रस्त्यावर पडले. शिक्षक शिंदे यांच्या हे लक्षात आले नाही. पेपर गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी या गहाळ झालेल्या पेपरची माहिती कळंबोली आणि कामोठे पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मोहिते यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
कामोठे येथे रस्त्यावर सापडलेल्या उत्तर पत्रिका या १२ वीच्या आहात. २५ पेपर चा एक बंच खारघर मधील एका शिक्षकाकडून गहाळ झाला होता. ही घटना ४ मार्च रोजी घडली होती. सध्या सर्व उत्तर पत्रिका ताब्यात घेण्यात आल्या असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. कामोठे पोलिंसा कडून सदर घटनेची चौकशी देखील सुरू असल्याची माहिती पनवेलचे गटशिक्षणाधिकारी मोहिते यांनी दिली आहे.