रेवदंडा (रायगड) : महेंद्र खैरे
अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे पर्वतवासी दत्त मंदिराचे नजिकच हिंगुळजा देवीचे मंदिर आहे. पुरातन व प्राचीन ऐतिहासिक मंदिरांपैकी एक असलेले हिंगुळजा माता मंदिराभोवतालची कोरीव लेणी पहाण्याजोगी आहेत. चौल-भोवाळेपासून फक्त अर्धा कि.मी. अंतरावरील छोट्याश्या डोंगरात स्थानापन्न आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात घटस्थापना, पूजा-आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
एका सलग पाषाणात कोरलेले दगडी मंदिर प्राचीन वास्तुशास्त्राचा उकृष्ट नमुना आहे. डोंगरावर मंदिराचे शेजारी असलेले बारमाही पाण्याचे दोन हौद विशेषः मानले जातात. या हौदात दान केलेले धन काशिला पोहचते अशी आख्यायिका सांगितली जाते. सुमारे १५८ पाय-या चढून गेल्यावर डोंगराचे कुशीत वसलेले मंदिर व्दापारयुगातील पांडवकालीन हिंगुळजा मातेचे मंदिर वसलेले आहे. पांडवाचे द्युतातील पराभवानंतर अज्ञातवासाच्या काळखंडात व्दापारयुगातील रेवतीनगर म्हणजेच चौल-रेवदंडा नगरीत ३६० मंदिरे व ३६० तलाव बांधण्याचा संकल्प करून प्रति काशी निर्मितीचे काम पांडवांनी हाती घेतले होते. सहा महिने दिवस व रात्र काम करीत असताना पहाटे कोंबडे आरवू नये असा दंडक ठेवला होता. पहाटे देवीने कोंबडयाचे रूप घेतले. कोंबडा आरवला, त्यामुळे पांडवांना काम सोडून द्यावे लागले आणि त्या कोंबड्यावर पांडवांनी बाण सोडून जखमी केले, आणि तो बाण हिंगुळजा मातेच्या मंदिराचे मागील बाजूस चिन्हाने दाखविला जातो. हिंगुळजा माता पांडवांची बहीण आहे, अशी पौराणिक आख्यायिका आजही येथील जुनी मंडळी सांगतात, असे हिंगुळजा मातेच्या मंदिरात तीन पिढयांची परंपरा असलेले गुरव संतोष काटकर यांनी माहिती दिली.
भणसाळी बांधवांचे आद्यदैवत हिंगुळजा देवी असल्याचेही सांगितले जाते. पौष पौणिमेच्या यात्रेचे निमित्ताने भणसाळी लोक मुंबईहून यात्रेसाठी येतात, येथे राहण्यासाठी त्यांनी निवासस्थान उभारलेले आहे. या मंदिराचा भणसाळी समुहाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून मंदिराचे सुशोभिकरण तसेच देखभाल केली जाते. सध्या मंदिराचे जीर्णोध्दार होऊन सुंदर असे मंदिर भणसाळी समुहाने ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेले आहे.
या डोंगरकडयांच्या आंग्ग्रेयेस पायथ्यापासून काही अंतरावर दरवाजा असलेली लहान बौध्द लेणी आहेत. बाहेर काही मीटर उंची रूंदीचा सज्जा असून शेड उभारण्यासाठी भोके आहेत. या लेण्यात कसलेही कोरीव काम नाही किंवा लेख नाही, या गृहेत लागूनच पश्चिमेस काही मिटर अंतरावर दुसरे लेणे आहे. समोरची बाजू तुटलेली असून व्हरांडा अरूंद आहे. दगड चांगला नसल्याने लेण्याचे काम अपुरे ठेवले असावे. या दोन लेण्याप्रमाणे पश्चिम बाजूस तितक्याच उंचीवर पश्चिमाभिमुख असलेल्या हिंगुळजा देवीच्या मंदिराकडे रस्ता जातो. मंदिरांकडे पाय-या चढत असताना पायरीच्या उजव्या बाजूस दगडात कोरलेले एक लेणे आढळते. त्यांच्या वायव्येकडील खोदलेल्या कोप-यांत आशापुरी देवीचे स्थान आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त हिंगुळजा मंदिरात घटस्थापना, पूजा-आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यामिनिमित्त मंदिरात नऊ दिवस कार्यक्रम होत असून भाविकांची मोठी गर्दी असते, अशी माहिती मंदिराची देखरेख करणारे गुरव संतोष काटकर यांनी सांगितले.
आकर्षक कोरीव शिल्प
दक्षिणेकडील भिंतीत चौरसाकृती आकाराच्या दोन खोल्या आहेत. पश्चिमेकडील समोरच्या भिंतीत खिडकी आहे. लेण्याच्या बाहेर उजव्या बाजूस ३० पाय-या चढून गेल्यावर दगडात खोदलेली पाण्याची दोन टाकी आहेत. पाय-यांच्या सुरूवातीजवळ थोडे उत्तरेस दरवाजाच्या आत हिंगुळजा देवीचे मंदिर असून त्यांच्या सभोवार अरूंद मार्ग आहे. समोर खुल्या जागेवर तुलशी वृंदावन व दीपमाळा आहे. तेथून लांबवरचा सुंदर देखावा दिसतो. मंदिरापलिकडे जवळच ओळीने पाच लहान बौध्द लेणी असून एका लेण्यात अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. सात क्रमांकाच्या लेण्याबाहेर स्तुपाचे उठाव शिल्प कोरलेले आहे.