रायगड जिल्ह्यात डोंगरांना आगी लागण्याच्या घटना वाढल्या Pudhari
रायगड

Raigad Hill Fires | जिल्ह्यात डोंगरांना आगी लागण्याच्या घटना वाढल्या

उरणमध्ये हिरवीगार निसर्गसंपदा नष्ट; वनविभागाकडून उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

जमिनी आणि गवत सुकल्यानंतर उरण पूर्व भागात डोंगरांना आगी लागणे सुरू झाले आहे. माती चोर आणि ठेकेदारांना माती उत्खनन करण्यास वाट मोकळी व्हावी या करता आगी लावल्या जात आहेत. वनविभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

उरण तालुक्यातील पूर्व भागातील निसर्गरम्य डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार समाजकंटकांकडून सुरूच आहेत. नुकतेच पिरकोन रस्त्यालगत डोंगराला लागलेली आग तीन तासांनी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना विझवण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये हिरवीगार निसर्गसंपदा नष्ट होत असल्याने हे वणवे लावणार्‍यांचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे. माती उत्खननासाठी या आगी जाणूनबुजून लावल्या जात असल्याचा आरोप निसर्गमित्रांनी केला आहे.एकीकडे महाराष्ट्र शासन करोडो रुपये वृक्षलागवडीसाठी खर्च करीत आहे. अनेक संस्थासुद्धा वृक्ष लागवड करीत आहेत. त्यामुळे डोंगर पठारांवर वृक्षांची हिरवळ वाढली आहे. पर्यायाने या वनराईमध्ये अनेक वन्य पशुपक्षांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या थंडीचा हंगाम सुरू असल्याने विविध प्रजातींच्या विणीचा हंगाम सुरू आहे. पक्षांच्या घरट्यात उबवणुकीची अंडी असतानाच काही समाजकंटक मुद्दामहून या हिरव्यागार वनराईला वणवे लावुन नष्ट करीत आहेत. त्यामध्ये विविध प्राणी पक्षी जळून नष्ट होत आहेत.

प्राणी, पक्षांबरोबरच विविध जातीच्या औषधी वनस्पतींची सुद्धा या आगीच्या वणव्यांमध्ये राख होत असल्याने निसर्गप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. दरवर्षी वणवे लागून हिरवीगार वनसंपदा नष्ट होऊ लागली तर शासनाने करोडो झाडे लावूनही महाराष्ट्रातील डोंगर भकास राहतील अशी भीती निसर्गप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात डोंगर क्षेत्रात गवत मोठ्या प्रमाणात वाढते आणि हिवाळा सुरू झाला की हे गवत सुकू लागते आणि या दरम्यानच आगी, वणवे लागण्याच्या घटना घडतात. यासाठी वन विभागाने ज्या ठिकाणी आगी लागतात त्या ठिकाणी सेफ्टी लाईन तयार करणे गरजेचे आहे. या सेफ्टी लाईनमधील गवत काढल्याने आग पुढे जाणार नाही. लोकांमध्ये विशेष करून डोंगर पट्ट्यात राहणार्‍या आदिवासींमध्ये यासाठी जनजागृती तयार करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी माती उत्खननाचे प्रकार होतात ते रोखणे गरजेचे आहे. वन्य प्रेमी, निसर्गमित्र आणि निसर्गप्रेमी संस्था यांची यासाठी रेस्क्यू टीम बनवून त्यांना वणवे विझविण्याचे प्रशिक्षण देवून वणवे विझविण्याचे साहित्य दिले पाहिजे तर वणवे लागण्याच्या घटना थांबू शकतील.
- विवेक केणी, निसर्ग मित्र, उरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT