Raigad Heavy Rains
अतिवृष्टीचा रायगडला तडाखा  Pudhari Photo
रायगड

Raigad Heavy Rains | अतिवृष्टीचा रायगडला तडाखा

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे दोघांचा बळी गेला आहे. जिल्हयात खाजगी, सार्वजनिक मालमतांसह पशुधनाचेही नुकसान झाले आहे. तर संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ७५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्हयात पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी जिल्हयात १७२५ मि.मी. पाऊस झाला आहे. जूनपासून पावसाने चांगले सातत्य ठेवल्याने सर्वसाधारण पावसाच्या ५५ टक्के पाऊस आतापर्यत झाला आहे. अद्याप अडीच महिने बाकी असल्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या व धरणांची पातळी वाढत असल्याने जीवित व वित्त हानी होत आहे.

महाड तालुक्यातील दादली येथे नदीमध्ये पडल्याने नामदेव अंबावले या इसमाचा मृत्यू झाला आहे तर पेण तालुक्यात सापोली येथे झाडावरून पडल्याने यश नाईक याचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील सात कच्च्या घरांचे पूर्णत, ९७ पक्‌या घरांचे अंशत, ५३ कच्च्या घरांचे अंशत नुकसान झाले आहे. २९ गोठे नुकसानग्रस्त झाले. सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले असून महाडमधील एका व्यायाम शाळेचय इमारतीचे पूर्णत व एका संस्थेच्या इमारतीचे अंशत नुकसान झाले आहे.

जिलह्यात शुक्रवारी (१९ जुलै) अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग तालुक्यात १५० मि.मी., पेण १८०, मुरुड ६६, पनवेल ५७, उरण १३७, कर्जत ५४, खालापूर ७०, माणगाव ९१, रोहा ८१, सुधागड ११४, तळा ४९, महाड १२५, पोलादपूर १४६, म्हसळा १३०, श्रीवर्धन १०२, माथेरान ६७ असा एकूण १७२५ मि.मी. पाऊस झाला आहे.

सरसरीच्या ५५ टक्के पाऊस

रायगड जिलह्यात सरासरी ३१०१ मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी जूनपासून सुरु झालेल्या पावसाने सातत्य ठेवले आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. १९ जुलैपर्यंत जिल्हयात १७११ मि.मी. अर्थात सरसरीच्या ५५ टक्के पाऊस झाला आहे. अद्याप पावसाळ्याचे अडीच महिने बाकी असल्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

जिल्हयात महाड, रोहा तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी सुरु असल्या तरी सावित्री, कुंडलिका आदी नद्यांचे पाणी पूर पातळीपासून कमी आहे. दिवसभरात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कुठेही दुर्घटना घडल्याची नोंद नव्हती. पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला असून जिल्हा प्रशासनाने आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

SCROLL FOR NEXT