खाडीपट्टा : गेली दोन दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीने महाड तालुक्यातील सापे तर्फे तुडील मधील सापे आदीवासीवाडी येथील सुनिल सखाराम पवार यांच्या घराची पडवी कोसळल्याने पडवीचे अंशत: नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आकराच्या दरम्यान घडली असून सुदैवाने घरातील तीनही माणसे सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पडवी कोसळली त्यावेळी घरामध्ये घराचे मालक सुनिल सखाराम पवार वय 30 वर्षे तसेच त्यांची पत्नी सुनिता सुनिल पवार वय 28 वर्षे व मुलगी सोनाली सुनिल पवार हे तिघेही घरीच होते. सुदैवाने घरातील कोणालाही या घटनेमुळे दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून ग्रुप ग्राम पंचायत नडगाव तर्फे तुडील सरपंच रिंकल सुकूम, सदस्य अनंत सुकूम, पोलीस पाटील ज्ञानदेव सुकूम आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच तेथील ग्रामस्थ यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी करुन महसुल विभागाला पंचनामा करण्यासाठी संपर्क साधला.
सदर पडवीचे बांधकाम हे जांभा दगडाचे आणि कौलारु होते. अतिवृष्टीमुळे पडवी कोसळून सदर पडवीचे झालेले नुकसान अंशत: असून सुमारे 24 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे रितसर पंचनाम्यामध्ये प्र.तलाठी अस्मिता खेदु यांनी नमुद केले आहे. आपत्ती घटनेनंतर सुनिल सखाराम पवार यांच्या परिवाराला गावातच भावाच्या घरी निवारा देण्यात आला आहे.
सुनिल पवार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. घराच्या पडवीचे अंशत: नुकसान झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटूंबाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.