तीव्र उन्हामुळे जिल्हावासियांना बाहेर पडणे कठीण होत आहे. Pudhari News Network
रायगड

Heat wave Alert | तीव्र उष्णतेमुळे रायगडची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सुरू

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. रायगड जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस पार जात असून, तीव्र उन्हामुळे जिल्हावासियांना बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यातूनच जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज असा उष्माघात कक्ष तयार केला आहे.

यावर्षी फेब्रुवारी संपताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. यात मागील काही दिवसांपासून कमालीची उष्णता वाढली आहे. सध्या तपमान 37 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळत असून रस्ते सामसूम दिसत होते. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी थंडपेयाकडे नागरिकांचा अधिक कल वाढला आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे उष्माघाताचा धोका अधिक असतो.

उष्माघाताची लक्षणे

चक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताचे लक्षणे आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचावाकरीता भरपूर पाणी सरबत प्यावे, सैल कपडे घालावे, उन्हात जाताना रुमाल, टोपी, छत्रीचा वापर करावा आदी प्रकारची काळजी घेतल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.

हे उपाय करा ...

उन्हाची तीव्रता बघता नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. सतत कुलर किंवा एसीच्या हवेत बसू नये. उष्माघाताची लक्षणे आढळून येताच आरोग्य कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. जिल्हयातील 55 प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू केरण्यात आला आहे. तेथे बेडची व्यवस्था करण्यात आली असून तेथे आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आली आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. दोन तीन दिवसात उपचार करूनही रूग्ण बरा होत नसल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात उष्णता वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दररोज तिन लिटरहून अधिक पाणी नागरीकांनी पीणे अपेक्षित आहे. या बरोबरच सकाळी 11.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास अधिक हिट असल्याने वयोवृध्दांनी घरातून बाहेर पडू नये असा सल्ला ही देण्यात आला आहे.
मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT