Local Train Pudhari
रायगड

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गासाठी ८९८ कोटींची निविदा

हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार

पुढारी वृत्तसेवा

रायगड: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर रेल्वे मार्गाचा गोरेगाववरून थेट बोरीवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सध्या रेल्वेकडे आवश्यक असलेली जागा उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष कामाला वेगाने गती देण्यात आली आहे. एकूण ८९८ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे.

८९८ कोटींचा विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना बोरीवलीवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि रायगड जिल्ह्यात पनवेलसाठी थेट लोकल ट्रेनने प्रवास करणे शक्य होणार आहे.

यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार असून, नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या थेट सेवेमुळे बोरीवली व उत्तर मुंबईतील नागरिकांना मोठा कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.

दरम्यान लवकरच पनवेल कर्जत लोकल रेल्वे प्रवासी सेवा सुरु होणार असल्याने पनवेल येथून थेट बोरिवलीपर्यत जा-ये करु इच्छिणाऱ्या प्रवाशांकरिता महत्वाची प्रवासी सूविधा उपलब्ध होवू शकणार आहे.

मुंबई लोकल नेटवर्कवरील प्रवासी ताण कमी होणार

सद्यस्थितीत मुंबई लोकल नेटवर्कवर प्रवाशांचा प्रचंड मोठा ताण वाढला आहे. एका ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वेतून रोज सुमारे ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यापैकी एकट्या पश्चिम रेल्वेवर दररोज ३० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा असते.

विशेषतः अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवली या स्थानकांवर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते. सध्या बोरीवली परिसरातील प्रवाशांना दक्षिण मुंबईत (हार्बर मार्गे) किंवा नवी मुंबईत पनवेलला जायचे असल्यास दादर, अंधेरी किंवा गोरेगावला उतरून ट्रेन बदलावी लागते, ज्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो. आता नव्या प्रकल्पामुळे वेळेची मोठी बचत होवू शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT