पनवेल ः रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या बेकायदा तस्करीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. गेल्या शुक्रवारी पनवेल रल्वे स्टेशनवर 35 कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जसह एका नायजेरीय महिलेला तीच्या लहान बाळासह अटक केल्यावर, आता सायन पनवेल महामार्गावरील कामोठे शहरानजिकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पो अडवून तपासणी केली असता, त्यात 17 लाख 40 हजार रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा निष्पन झाला, असून पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. शिवाय 5 लाख रुपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्ताला अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.बी. गोरे यांनी कामोठे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या सहकार्याने सोमवारी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यांत ही बेकायदा घुटक्यांची पाकीट े सापडली आहेत. पोलिसांना त्यांच्या खबर्याकडून या बेकायदा गुटका वाहतूकीबाबत माहिती होती, ती पक्की ठरली.
टेम्पो चालक फरहान मजीद शेख (वय 23, रा. कांदिवली) याला अटक करण्यात आली आहे. तर टेम्पोतील तब्बल 17 लाख 40 हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य सरकारने प्रतिबंधीत केलेले गुटखा जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या टेम्पोची किंमत पाच लाख असल्याचे पोलीसांनी सांगीतले. हा गुटखा विक्रीसाठी कुठे घेऊन जात होते, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.
बेकायदा गुटखा तस्करी करणारा मुख्य आरोपी भिवंडी येथील शौकत अली याचाही शोध घेण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार जनार्दन सहदेव पवार यांनी कामोठे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्री करणारे एजन्ट आणि दुकानदार सध्या पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान रायगड पोलीसांनी यापूर्वी नेरळ पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्त कारवाई करत जिते गावात गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून कारखाना सील केला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. मुरुड मध्ये बेकायदा गांजा या अमली पदार्थाचे रॅकेट उद्धवस्थ करुन 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदा अमली पदार्थ तस्करी विरोधी कारवायी करीता रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात बेकायदा अमली पदार्थ खरेदी-विक्री आणि तस्करी या बाबत सतर्कतेचे आदेश दिले आहेत.