अतुल गुळवणी
अलिबाग : भारताने आधुनिकतेची कास धरली आहे. सर्वच क्षेत्रात देश उत्तुंग भरारी घेत आहे. पण त्याचबरोबरच रुढी, परंपरा, सण, उत्सव मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करताना मुहूर्त पाहण्याची परंपरा आजही अखंडित आहे. अगदी शेतातील पेरणीपासून, भातकाढणीपर्यंत, अथवा नवीन वाहन खरेदी करण्यापासून, घरबांधणी आदी कार्यासाठी मुहूर्तच शोधला जातोय आणि हा मुहूर्त शोधण्यासाठी पंचांगांशिवाय पर्याय नाही.आजही अनेक कुटुंबात पंचांग शोभे भिंतीवरी या उक्तीप्रमाणे दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन पंचांग?घेऊन त्याचे पूजन करण्याची परंपरा जोपासली जात आहे.
पंचांग आणि हिंदू यांचे एक अतुट असं नातं आहे. विज्ञानाने प्रगती साधली असली तरी तेवढेच महत्व पंचांगशास्त्रालाही प्राप्त झालेले आहे.आजही महाराष्ट्रात कोल्हापूरचे लाटकर पंचांग,मुंबईचे निर्णयसागर, सोलापूरचे दाते पंचांग यांची मोठी ख्याती आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य आमावस्या या बारा मासांचे पंचांग प्रसिद्ध केले जाते.आजही ग्रामीण भागात गुढीपाडव्याला सामुहिक पंचांग वाचनाची प्रथा आहे. गावाचे ग्रामजोशी हे गावातील मंदिरामध्ये या पंचांगांचे सामुहिकरित्या वाचन करतात. यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी आवर्जून?उपस्थित असतात. कालौघात ही परंपरा काही प्रमाणात कमी झालेली आहे. घरी गुढी उभा करुन,त्याची विधिवत पूजा केली जाते.
दरवर्षी पंचागात बारा मास असले तरी यावेळी अधिक ज्येष्ठ मास येत असल्याने यवेळी 13 मासाचे पंचाग तयार करण्यात आले आहे. पंचांगामधूनही पर्जन्य विचार जाहीर केला जातो.पावसाळ्यातील सर्वच नक्षत्रांचा उहापोह या पंचांगामधून करण्यात येतो.कोणते नक्षत्र कधी सुरु होणार,त्याचे वाहन कोणते,पावसाचे प्रमाण कसे आहे याची सविस्तर माहिती यामध्ये कथन केलेली असते.अनेकदा हवामान शास्त्राप्रमाणेच पंचांगशास्त्रानुसार देखील पर्जन्यवृष्टी होत आल्याचे दिसून आलेले आहे.
पंचांगशास्त्राची निर्मिती तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या पाच अंगांवर निर्मिती केली जाते. दररोजची आकाशातील ग्रहस्थितींच्या आधारे पंचांगात याची माहिती दिली जाते. त्या आधारे दैनंदिन माहिती पंचांगातून दिली जाते.त्याद्वारे त्या दिवसाचे महत्व सुचित केले जाते.
कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पंचांगांचा आधार घेण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे.अगदी सत्ताग्रहणासाठीही राज्यकर्ते आधी कोणता मुहूर्त कधी लाभाचा आहे हे पाहतात मगच सत्ताग्रहण करतात.निवडणुकीचा अर्ज असो वा एखादा प्रकल्प सुरु करणे असो. निवडणुकीत उभा राहणाराही आपल्याला ग्रहमान अनुकूल आहे का याची पाहणी करुनच मग निवडणुकीच्या रिंगणात उतरतो. वाहन, घर घेण्यासाठीही मुहूर्त पाहूनच निर्णय घेतला जातो. अर्थात हे सारे पंचांगाशिवाय शक्य नाही. त्यामुळे आजही पंचांगाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे.
ग्रामीण भागात शेतकरी पंचांगावर आधारित आपल्या शेतीची निगराणी करत असतो. अगदी रोहिणी नक्षत्रात धुळपेरणी करण्यापासून मृगात कोणत्या दिवशी भाताची पेरणी करण्यासाठीही मुहूर्तच पाहिला जातो. भात कापणी असो वा घरात भात आणणे असो या दिवशीही मुहूर्त पाहिला जातो.