अलिबाग (रायगड) : गुढीपाडव्याच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याच्याशिवाय दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. झेंडूच्या फुलांचे हार बनवले जातात. त्यामुळे दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सणांना झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते.
गेल्या काही दिवसांपासून थंड असलेला फुलांचा बाजार आता तेजीत दिसत आहे. मात्र मागणीपेक्षा झेंडूच्या पुलांची आवक कमी असल्याने झेंडूच्या फुलांचे दर काहीसे वाढलेले आहेत. सध्या छोटा झेंडू 100 ते 120 रूपयांना विकला जात आहे तर मोठया झेंडूचा दर किलोला 150 रूपये इतका आहे. आज झेंडूच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. यावेळी उभारण्यात येणारया गुढीची पूजा अर्चा करण्यासाठी तसेच गुढीला तोरण बांधण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते.
जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहेत. अलिबाग शहरातील बाजारपेठ तसेच रस्त्याच्या कडेला झेंडूच्या फुलांचे ढीग पहायला मिळत आहेत. पाडव्याच्या पुजेसाठी झेंडूबरोबरच बिजली, गुलछडी आदी फुलांना मागणी आहे.