जीएसटी कौन्सिल Pudhari
रायगड

GST Council Decisions | जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; जीएसटी कौन्सिलचे महत्त्वाचे निर्णय

महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

पुढारी वृत्तसेवा

GST Council meeting updates

रायगड:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत नागरिकांच्या हिताच्या व देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.               

जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयात “सर्वांसाठी विमा” या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कौन्सिलने सर्व व्यक्तीगत आरोग्य व जीवनविमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नधान्य व आरोग्याशी संबंधित वस्तूंवरील करांच्या दरात कपात करून कर वर्गीकरणाची संख्या घटवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाईट गुड्स उद्योगातील विशेषतः टीव्ही, एअर कंडिशनरवरील करांचे दर १८ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी साबण, डिटर्जंट, टॅल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील करदर कमी करण्यात आले. वस्त्रोद्योगातील तयार कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील करदरही कमी करण्यात आले आहेत. खत निर्मिती क्षेत्रातील नायट्रस अॅसिड, अमोनिया, वस्त्रोद्योगातील सूत, तसेच चामड्यावरील दर कमी करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी सिमेंटवरील कर २८% वरून १८% करण्यात आले आहेत. लहान प्रवासी वाहने व मालवाहतूक वाहने यांवरील कर १८% करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्रातील वाहनउद्योग व निर्यात क्षेत्राला चालना मिळेल.

शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील कर १८% वरून ५ % करण्यात आला. याचा थेट लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. जैविक कीटकनाशके, खते, सिंचन साधने व इतर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीवरील कर १८ % / १२% वरून ५ % करण्यात आले आहेत. ज्यामुळे शेती उत्पादनाचा खर्च कमी होईल. सर्व औषधांवर १२/१८ % ऐवजी ५ % कर आकारला जाईल, तसेच काही जीवनावश्यक औषधे करमुक्त करण्यात आली आहेत. हे सर्व निर्णय जनतेच्या हितासाठी व देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या वतीने या निर्णयांचे स्वागत करून करसंकलनाची शिस्त वाढवण्यासाठी काही उपाययोजना लागू करण्याची विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT