खोपोली ः मुंबई पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळा जवळ मंकीहिल येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालगाडीच्या बोगीची चाके रेल्वे रुळावरून घसरल्याने अपघात घडला असून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र पुण्याकडे जाणार्या अनेक गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.
खंडाळा घाटात मंकी हिल जवळ पुण्याकडे जाणार्या रेल्वेच्या सुरक्षा रक्षक बोगीची चाके निखळून पडल्याने पूण्याकडे जाणारी ट्रेन वाहतूक घाटात ठप्प झाली आहे. मुंबई हुन पूण्याकडे जाणार्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे व मालगाड्या कर्जत व पळसदरी येथे थांबविण्यात आल्या आहेत.सोलापूर वंदे भारत ,जोधपूर हडपसर, कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल नांदेड या ट्रेन रखडल्या असून काही ट्रेन्स पनवेल स्टेशनला थांबविण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले असले तरी वाहतूक पूर्ववत सुरु होण्यास अद्याप चार तासांचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या सुत्रांनी दिली आहे.