विक्रम बाबर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा देत मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी (अभय योजना) महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. महापालिका आयुक्त मंगल चितळे यांनी आज पत्रकार परिषद घेवून, या अभय योजनाची माहिती दिली. या योजनेनुसार नागरिकांना मालमत्ता करावरील शास्तीवर मोठी सूट मिळणार असून, नियत कालावधीत थकबाकी भरल्यास जास्तीतजास्त ९० टक्के आणि वेगवेगळ्या टक्केवारीने शास्ती माफ केली जाईल.
पनवेल महानगरपालिकेच्या आवारात आज भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन झाले. या ठिय्या आंदोलना नंतर पालिकेचे आयुक्त यांनी, पत्रकार परिषद घेत मालमत्या करावरील शास्ती मध्ये सूट देण्यासाठी अभय योजनेची घोषणा केली, मात्र या आंदोलना दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी १०० टक्के मालमत्ता करावरील शास्ती माफ करावी अशी मागणी केली, या मागणीला बगल देत आयुक्तांनी टप्पे निहाय शास्ती मध्ये सूट जाहीर केली आहे, त्या नुसार जास्तीत जास्त ९० टक्के सूट पालिकेने जाहीर केली आहे. त्या साठी विविध दिवसाची मुदत घोषित केली आहे
१८/०७/२०२५ ते १५/०८/२०२५ : ९० टक्के
१६/०८/२०२५ ते ३१/०८/२०२५ : ७५ टक्के
०१/०९/२०२५ ते १०/०९/२०२५ : ५० टक्के
११/०९/२०२५ ते २०/०९/२०२५ : २५ टक्के
योजनेनुसार, मालमत्ता धारकांनी ठरवलेल्या तारखांमध्ये थकबाकी रक्कम भरल्यास त्यांना अनुक्रमे शास्ती माफी मिळेल. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि थकबाकी लवकरात लवकर भरावी . या संदर्भातील आदेशाची प्रत महापालिकेच्या संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका कार्यालयात आवश्यक ती माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. पनवेल महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, वेळेत कर भरून शास्ती माफीचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात हातभार लावावा.