खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
खाडीपट्ट्यातील गोमेंडी-मुळगाव परिसरातील भातशेतीचे खाऱ्या पाण्यापासून होणार संरक्षण होणार आहे. येथील उघाडीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
भरतीचे पाणी भातशेतीमध्ये ओलांडू नये याकरिता साधारण तीन दशकांपूर्वी बांधलेल्या गोमेंडी मूळगाव येथील उघाडीच्या दुरुस्तीचे काम सुरू होता होताच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सदर कामामध्ये पारदर्शकता असावी यासाठी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी लक्ष घातले आहे. कामाची सुरुवातीलाच कामामध्ये पारदर्शकता आढळून न आल्यामुळे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि ठेकेदाराला कामाचा दर्जा पारदर्शक असावा यासाठी मागणी केली.
सध्या सुरू असलेल्या कामामध्ये पारदर्शकता आढळून न आल्याने निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा ठपका स्थानिक नागरिकांनी उपस्थित करून उघडीचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होईल का ? असा स्थानिक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला असून त्यामुळे खाडीपट्टयातील सदर उघाडीच्या कामाचा दर्जा विषयी सोशल मीडियावर मुद्दा गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाड तालुक्यातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गोमेंडी मुळगाव आणि गोमेंडी ताडवाडी या गावांच्या दरम्यान भात शेतीला भरतीचे खारे पाणी पोहोचू नये ते पाणी भरतीच्या दरम्यान आडवले जावे याकरिता साधारण तीन दशकांपूर्वी बांधलेल्या उघाडी च्या दुरुस्तीचे काम सध्या खारलँड विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. भरती आल्यानंतर या उघाडीचे दरवाजे आपोआप बंद होतात त्यामुळे खारे पाणी शेतीकडे जात नाही.
अशा प्रकारची उघाडी शेतकऱ्यांच्या शेतीचे पीक वाचवण्यासाठी बांधण्यात आली होती. सदर उघाडीच्या दुरुस्तीचे काम यापूर्वी देखील दोन वेळा करण्यात आले आहे. कामामध्ये कामाची पारदर्शकता दिसून न आल्यामुळे तेथील स्थानिक जागरूक नागरिकांनी सदर ठेकेदाराला बोलावून काम थांबवण्याची आणि पुढे होणारे काम पारदर्शक व्हावे ही मागणी केली आहे. त्यावर सदर ठेकेदाराने काम मुळात नुकतेच सुरू झालेल्या आहे आणि कामामध्ये हलगर्जीपणा न करता त्यामध्ये निश्चितच पारदर्शकता असेल असेच काम करण्यात येईल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांना दिला आहे.
दरम्यान, उघाडीच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या स्टील संदर्भात देखील स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या वायरल पोस्टमुळे ठेकेदार यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर काम पारदर्शकतेने केले जाईल आणि सरकारचा पैसा देखील वाया घालवला जाणार नाही असा विश्वास दिला आहे.
नागरिकांनी वेळीच विकास कामावर लक्ष देऊन सदर काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्यामुळे कामामध्ये यापुढे पारदर्शकता पाहायला मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गोमेंडी मुळगाव येथील उघाडीच्या कामामध्ये पारदर्शकता आढळून न आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन कामामध्ये पारदर्शकता असावी यासंदर्भात ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. सदर कामामध्ये हलगर्जीपणा नको. काम पारदर्शक झाले पाहिजे. ही आमची स्थानिकांची मूळ मागणी आहे.संदेश गोठल, माजी सदस्य, ग्रामपंचायत वराठी
गोमेंडी-मूळगाव येथील उघाडीच्या कामाला नुकतेच सुरुवात करण्यात आली आहे. हे काम पारदर्शकच करण्यात येईल.अक्षय जाधव, ठेकेदार