पनवेल : कामोठे शहरात गेल्या काही दिवसांपासून चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चोरटे आता केवळ रस्त्यावरच नव्हे, तर थेट सोसायट्यांच्या आवारात, जिन्यांमध्ये आणि प्रवेशद्वाराजवळ महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या चैन हिसकावून पळ काढत आहेत. अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना सेक्टर-५ मधील प्रमोद अपार्टमेंटमध्ये घडली असून ४५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्याने हिसकावून नेली. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी दुबे (वय ४५) या आपल्या मुलीला खासगी क्लासमधून घेऊन सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घरी परतत होत्या. त्या प्रमोद अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारातून सोसायटीच्या आवारात प्रवेश करताच त्यांच्या मागावर असलेल्या एका चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जोरात खेचली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षण त्या हादरल्या; मात्र त्यांनी धाडस दाखवत चोरट्याचा पाठलाग सुरू केला.
महिलेने आरडाओरडा करत पाठलाग केल्यामुळे चोरटा गोंधळला. पळून जाताना त्याने वापरत असलेली दुचाकी शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकून घटनास्थळावरून पायी पसार झाला. संबंधित दुचाकीचा क्रमांक एमएच-०५-डीसी-५५१६ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या माहिती नुसार आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांत चार ते पाच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट निवासी सोसायट्यांकडे वळविल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घराच्या दारापर्यंत महिलांचा पाठलाग करून चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या वाढत्या घटनांमुळे कामोठे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घडणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे चोरट्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळेत बाजारपेठा, सोसायट्यांचे परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीची मालकी तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.