रायगड ः जयंत धुळप
कोकणातील कोणताही सण असो त्यास प्राचीन परंपरा आहे. आणि म्हणूनच त्या परंपरेने आलेल्या प्रथा या सणांमध्ये खंड पडू न देता येणारी प्रत्येक पिढी अत्यंत श्रद्धेने जोपासत असतात. त्यातलीच एक अत्यंत श्रद्धेय परंपरा म्हणजे गोकूळाष्टमीच्या दिवशी गोविंदांच्या अंगात संचारणारे श्रीकृष्णाचे वा कान्होबाचे वारे ही परंपरा आहे.
श्रीकृष्णाचीच पूजा करीत असल्याचा भाव
रायगड जिल्हयातील अलिबाग, रेवदंडा, शहापूर, सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा आदि ठिकाणी ही अत्यंत अनोखी प्राचीन प्रथा आहे. यामध्ये गोविंदाच्या अंगावर श्रीकृष्णाचे वारे संचारल्यावर चक्क आसुडाचे फटके मारले जातायत. श्रीकृष्ण संचारलेल्या या गोविंदाची महिला अत्यंत श्रद्धेने पूजा करतात. त्यावेळी आपण श्रीकृष्णाचीच पुजाकरिता असल्याचा भाव या महिलांच्या मनात असतो.
अलिबाग येथील मांडवकर यांच्या श्रीकृष्ण मठात ही परंपरा 100 वर्षापेक्षा अधिक काळपासून चालत आलेली आहे. येथील कृष्णा पुजारी यांच्या अंगात ज्यावेळी श्रीकृष्णाचे वारे संचारत असे त्यांवेळी ते जो आशिर्वाद देत असत तो खरा ठरत असे अशी माहिती जून्या जाणकारांनी या निमीत्ताने बोलताना दिली आहे.
पाठीवर उठत नाहीत आसूडाचे वळ
वारे संचारणे म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णच अंगात येतो आणि त्यावेळी त्या गोविंदाला चक्क आसुडाचे फटके मारण्यात येतात. आसूडाचे हे फटके थेट श्रीकृष्णच झेलत असल्याने आम्हाला ते लागत नाहीत वा कोणत्याही प्रकारे जखम वा वळ पाठीवर उठत नाहीत, अशी माहिती अंगात वारे संचारणार्या गोविंदांनीच दिली आहे.
वारे संचारलेल्या गोविंदाच्या डोक्यावर फोडली जाते हंडी
अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. गोविंदांच्या अंगात श्रीकृष्णाचे म्हणजेच कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेतो.
कोकणातील गावांमध्ये हा सोहळा काही ठिकाणी कृष्णजन्मावेळी रात्री 12 वाजताच दहीहंडी फोडल्यावर होतो तर काही गावांमध्ये गोपालकाल्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता होत असतो. या सर्व प्रथांमध्ये आसुडाचे फटके मारुन घेणार्या गोविंदाच्या डोक्यावर दहीहंडी फोडण्याची देखील प्रथा आहे.