ऋषिता तावडे
रायगड : रायगड जिल्ह्यात असलेल्या; परंतु मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी देणार्या घारापुरी बेटाचा १,५०० वर्षांपासूनचा इतिहास उजेडात आला आहे. इ.स. तीनपासूनच मुंबईला आंतरराष्ट्रीय मान्यता होती, असे स्पष्ट करणारे पुरातन दस्तावेज आणि इतर पुरावे घारापुरी बेटाच्या उत्खननात सापडले आहेत. त्यामुळे ९०० वर्षे कार्यरत असलेल्या घारापुरी व्यापार केंद्राचा नवा इतिहास समोर आला आहे.
उत्खननात तत्कालीन चलनी नाणी, राजवटींचे शिक्के आणि इराणच्या त्यावेळच्या चलनी नाण्याचे पुरावे आणि महत्त्वाचे ताम्रपट सापडले आहेत. घारापुरी इ.स.वी. ३ ते इ.स. ११ असे जवळजवळ ९०० वर्षे हे समृद्ध व्यापारी केंद्र हाेते याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. तिसर्या आणि चौथ्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत हे बंदर अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. या बंदरावर मोठा व्यापार चालत असे. येथून इराण आणि अरब राष्ट्रांत व्यापारी देवाण-घेवाण होती. या दोन्ही देशांचे चलनी शिक्के सापडले आहेत. प्राचीन नाणी, भांडी आणि व्यापारी खुणा या बंदराचे महत्त्व स्पष्ट करतात. या आंतरराष्ट्रीय बंदराचा वारसा आता ‘जेएनपीए’ला मिळाला आहे. भारतीय पुरातत्त्व आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने गेले आठ महिनेे या बेटाचा इतिहास शोधण्यासाठी उत्खनन सुरू आहे.
चालुक्य राजवटीपासून मध्य प्रदेशाचे त्यावेळचे ताकदवान हिंदू राजे कृष्णराज आणि त्यांचे राज्य छत्रक आणि महछत्रक राजवटीतील राजाचा शिक्का असलेले राज चलन सापडले आहे. यातून तत्कालीन राजवटीचा इतिहास पुढे आला. त्याचबरोबर त्या काळात कार्यरत असलेले इराणचे ससेनीयन राजे यांचे चलनही सापडले आहे.